
कणकवली : वृक्षांची महती प्राचीन काळापासून ज्ञानेश्वरीच्या पाचव्या अध्यायामध्ये स्पष्ट करण्यात आली आहे. म्हणूनच पर्यावरण वाचवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे, असे प्रतिपादन कायदेतज्ञ अॅड. उमेश सावंत यांनी केले. कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित 'एक पेड माँ के नाम' या उपक्रमांतर्गत मंडळाचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांना वृक्ष वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ऍड. सावंत बोलत होते. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष सतीश सावंत, चेअरमन आर. एच. सावंत, खजिनदार गणपत सावंत, सदस्य तुषार सावंत, संतोष सावंत, पर्यवेक्षक बयाजी बुराण आदी मान्यवर उपस्थित होते.
उमेश सावंत म्हणाले, ज्ञानेश्वरांनी 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे' असे म्हणत वृक्षाला आपलेसे केले आहे.हा विचार आपण समजून घेतला पाहिजे. पृथ्वीचा समतोल बिघडत चालला आहे. परंतु, याचे ज्ञान आपल्याला प्राचीन ग्रंथातूनच मिळाले आहे. ही ग्रंथसंपदा आणि त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आजच्या पिढीने प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे. 'एक पेड अपने माँ के नाम' म्हणजेच आपण एका वृक्षाची अर्थात आईच्या विचारांचे जतन करणार आहोत, असेही सावंत म्हणाले.
सतीश सावंत म्हणाले कनेडी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात. परंतु, आजचा उपक्रम अतिशय महत्त्वाचा आहे. पर्यावरण रक्षणाची जबाबदारी आपली आहे. भविष्यातील पिढीचे रक्षण करणारा हा निसर्ग आपणच आपला पाहिजे. म्हणूनच या वृक्षांचे वाटप करत आहोत. प्रत्येकाने आपल्या आईप्रमाणे या वृक्षाला जोपासावए. पर्यावरण रक्षण करत असताना आधुनिक जीवनशैलीपासून दूर राहा. प्लॅस्टिकचा वापर करू नका. अधिकाधिक निसर्गावर प्रेम करा. निसर्ग समजून घ्या असे आवाहन त्यांनी केले. आर.एच. सावंत यांनी प्रास्ताविकपर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद मसुरकर यांनी केले.