
कणकवली : महामानवांचे कार्य हे मानवमुक्तीचे असते. महामानवांना जातीची प्रतिके म्हणून पुढे आणू नका. महामानवांचे कार्य हे एका जाती पुरते मर्यादित नसते तर समस्त मानवासाठी असते. गुलामगिरीच्या जगण्यातून खºया अर्थाने मुक्तीचे जीवन ज्यांच्यामुळे आपल्या वाट्याला आले; त्या महामानवांच्या समतावादी विचारांचा समाज घडवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा. स्वाभिमानी व स्वावलंबी समाज निर्माण व्हावा यासाठी महामानवांच्या विचारांशी प्रामाणिक राहणारी माणसे खºया अर्थाने समाज घडवत असतात, असे प्रतिपादन लोक स्वराज्य आंदोलनाचे संस्थापक, नांदेड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा.रामचंद्र भरांडे यांनी केले.
येथील एचपीसीएल सभागृहात क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी महासंघ आणि साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने अण्णा भाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान व पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित केला होता. याप्रसंगी श्री. भरांडे बोलत होते. यावेळी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे साहित्य परिषदेचे राज्य महासचिव प्रा. डॉ. राज ताडेराव , कणकवली महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज महालिंगे, क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष डॉ.सोमनाथ कदम, जिल्हाध्यक्ष सुधाकर भिंगार दिवे, जिल्हा सचिव डॉ. देविदास हारगिले, आनंद कासारडेकर, संध्या तांबे,राजाराम फाळके, साहेबराव आवळे, डॉ. राजेंद्र चव्हाण, मारुती कांबळे, प्रा. एम. जे.कांबळे, समर्थ सेन पेठे, साहेबराव गायकवाड, डॉ. बी. एल. राठोड., डॉ.सुरेश पाटील, डॉ.श्यामराव दिसले, प्रा. प्रमोद कोरगावकर, श्री मंगेश आरेकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात अण्णाभाऊ प्रेमी श्रोते उपस्थित होते. प्रा.रामचंद्र भरांडे यांनी महामानवांची चळवळ, वर्तमान समाजातील प्रश्न, लोकसहभागाची गरज याविषयी भाष्य केले.
डॉ. राज ताडेराव म्हणाले की, अण्णा भाऊ साठे यांनी विशाल साहित्य निर्माण केले आहे. त्यांनी आपल्या साहित्यातून क्रांतिकारी विचार पेरले. अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी या अशा प्रबोधनपर उपक्रमाची गरज आहे. प्राचार्य युवराज महालिंगे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील उदाहरणे देत अण्णाभाऊंच्या परिवर्तनवादी विचारांचा आढावा घेतला.
यावेळी प्रा.रामचंद्र भरांडे यांना साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने तर जिल्ह्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कृष्णा पाताडे, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी व्यवस्थापक डी.के. पडेलकर. विद्या मंदिर हायस्कूल कणकवली चे मुख्याध्यापक पी. जे.कांबळे, सम्यक साहित्य संसदेचे अध्यक्ष, अनिल जाधव, फोंडाघाट येथील सामाजिक कार्यकर्ते मिलिंद जाधव यांना साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. आरंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. सूत्रसंचालन कवयित्री प्रा. सुचिता गायकवाड यांनी केले. आभार हिरालाल वाघमारे यांनी मानले.