
कणकवली : ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू रुग्णांना मणक्याच्या व्याधीतून मुक्त करण्यासाठी 'दि स्पाईन फाऊंडेशन, मुंबई' आणि उपजिल्हा रुग्णालय, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शस्त्रक्रिया शिबीर अत्यंत यशस्वी झाले. देशातील नामवंत स्पाईन सर्जन डॉ. शेखर भोजराज आणि त्यांच्या टीमने दोन दिवसांत ११ रुग्णांवर मणक्याच्या अत्यंत जटील आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या.
उपजिल्हा रुग्णालयात मणक्याच्या आजाराचे तपासणी शिबीर २६ नोव्हेंबर रोजी घेण्यात आले होते. या शिबिरात २१० रुग्णांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी ११ रुग्णांना शस्त्रक्रियेची तातडीची गरज असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार १९ आणि २० डिसेंबर रोजी या शस्त्रक्रिया पार पडल्या. विशेष म्हणजे, या शिबिरात दोन ज्येष्ठ रुग्णांच्या मानेच्या आणि कंबरेच्या मणक्याच्या अशा दोन्ही शस्त्रक्रिया एकाच वेळी करण्यात आल्या, जे वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत आव्हानात्मक मानले जाते.
मणक्याच्या अशा प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी मोठ्या शहरांतील खासगी रुग्णालयांमध्ये ५ ते ७ लाख रुपये खर्च येतो. मात्र, डॉ. शेखर भोजराज यांच्या संकल्पनेतून गरीब व आर्थिक स्थिती नाजूक असलेल्या रुग्णांना ही सेवा पूर्णपणे मोफत देण्यात आली. फाऊंडेशनची टीम स्वतःच्या खर्चाने दुर्गम भागात जाऊन अशा सेवा देत आहे. या कामी त्यांना विविध स्वयंसेवी संस्था आणि शासकीय योजनांचे सहकार्य मिळत आहे.
या मोहिमेत मुंबईहून डॉ. शेखर भोजराज यांच्यासह डॉ. आदित्य काशीकर, डॉ. सतीश सूर्यवंशी, डॉ. निसाद सितूत, डॉ. प्रणित पावसकर, डॉ. रवी त्रिवेदी, रोशन कुळे, सुशांत रेमजे, ओंकार राणे, कोल्हापूरहून डॉ. सलीम लाड, डॉ. रवी पटेल, डॉ. रिशी पाटील, प्रसाद पाटील आणि कणकवलीतील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. धनंजय रासम, डॉ. सर्वेश तायशेटे, डॉ. सतीश डोंगरे, डॉ. मानव पटेल तसेच भूलतज्ज्ञ डॉ. होमा तायशेटे, डॉ. नूतन रासम, डॉ. आकांक्षा तायशेटे, डॉ. धनेश म्हसकर, उपजिल्हा रूग्णालयातील नुपूर पवार, श्रद्धा तेंडुलकर, चंद्रलेखा तेली, अमोल दळवी, नितीका सावंत, प्रज्ञा राणे, फार्मासिस्ट अनिलकुमार देसाई, प्रिती कोरगावकर सहभागी झाले होते.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, कार्यकारी अभियंता श्री. बागूल, सिव्हिल सर्जन डॉ. श्रीपाद पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनंत डावांगे, उपजिल्हा रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. पंकज पाटील, डॉ. रेड्डी, डॉ. विद्याधर तायशेटे, डॉ. सुहास पावसकर, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अस्थिव्यंगशास्त्र विभागप्रमुख डॉ. विजय वाघमारे यांचे विशेष सहकार्य लाभले. उपजिल्हा रुग्णालयातील नर्सिंग स्टाफ, अरणि फार्मासिस्ट यांनीही यात सक्रिय सहभाग घेतला.
पुढील शिबीर ३ मार्च रोजी !
दी स्पाईन फाऊंडेशनमार्फत ३ मार्च, २०२६ रोजी पुन्हा एकदा मणक्याच्या आजारांचे तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या तपासणीत शस्त्रक्रिया आवश्यक असणाऱ्या रुग्णांवर २७ आणि २८ मार्च, २०२६ रोजी










