
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक गड, किल्ल्यांचे व्यसनमुक्ती संवर्धन करण्याच्या मोहिमेचा शुभारंभ ११ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता वेंगुर्ले तालुक्यातील रेडी येथील यशवंतगड येथे होणार आहे. यावेळी पालकमंत्री नीतेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांची प्रमुख उपस्थिती असणार असल्याची माहिती नशाबंदी मंडळाच्या जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी दिली आहे.
हा उपक्रम नशामुक्त भारत अभियानांतर्गत जिल्हा नशामुक्त भारत अभियान समिती, जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग, जिल्हा पोलीस विभाग, दुर्गा मावळा प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, दुर्गरक्षक प्रतिष्ठान रेडी यांच्या सहभागाने व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आयोजनातून राबवण्यात येणार आहे. यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक गडकिल्ल्यांवर अशा प्रकारचा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
जगाच्या नकाशावर ऐतिहासिक वारसास्थळे असणारा जिल्हा म्हणून सिंधुदुर्गची ओळख आहे. जिल्ह्यातील गड-किल्ले हे शिवप्रेमी आणि पर्यटकांसाठी प्रेरणादायी स्थळे आहेत. मात्र, अनेक ठिकाणी नशेच्या पदार्थांचा वापर व अस्वच्छता वाढलेली आहे. या पार्श्वभूमीवर गडकिल्ले व्यसनमुक्त करून ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करण्यासाठी ही मोहिम राबविण्यात येत आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून जिल्ह्यात नशाबंदी मंडळाच्या वतीने अमली पदार्थविरोधी जनजागृती सुरु आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि सामाजिक संस्थांबरोबर मिळून या चळवळीला नवा वेग देण्यासाठी ही मोहीम सुरु करण्यात येत आहे. शुभारंभ सोहळ्यासाठी शिवप्रेमी, युवक, महिला बचतगट व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अर्पिता मुंबरकर यांनी केले आहे.










