
कणकवली : बिबट्याची नखे व सुळे तस्करी प्रकरणी वनविभाग कणकवलीच्या पथकाने आशुतोष अनिल मेस्त्री (३२, रा. करंजे) या आणखी एका संशयिताला गुरुवारी अटक केली. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची वन कोठडी सुनावली. तर याप्रकरणी यापूर्वी अटक व वन कोठडीत रावानगी झालेल्या चारही संशयतांची कोठडीची मुदत संपल्याने शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्या चारीजणांना वन कुठली सुनावली.
ही कारवाई वनविभागाच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास डामरे येथे केली होती. याप्रकरणी विजय महादेव हळदिवे (रा. फोंडाघाट, ता. कणकवली), कृष्णात भिकाजी रेपे (रा. अकनुर, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर), तौफीक अल्लाउद्दीन सनदी (रा. गळतगा, ता. चिकोडी, जि. बेळगाव), परशुराम प्रकाश बोधले (रा. नवलीहळ, ता. चिकोडी, जि. बेळगाव) अशा चार जणांना अटक करण्यात आली होती. या संशयित यांची वनकोठडीत रवानगी झाली होती. वन कोठडीतील तपासणी दरम्यान संशयितांना आशुतोष मेस्त्री याच्याकडूनच बिबट्याची नखे व सुळे प्राप्त झाले होते, अशी माहिती वनविभागाच्या पथकाला मिळाली. त्यानुसार आशुतोष्याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती कणकवलीचे वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांनी दिली.










