
कणकवली : तिवरे - गावठाणवाडी येथील आमच्या मालकीच्या जमिनीमध्ये वीज वितरण विभागाकडून कोणतेही परवानगी न घेता वीज पोलटाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. याबाबत विचारणा केली असता सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जात आहे. सदर जमिनीमध्ये हाय व्होल्टेज लाईन नेल्यास त्याचा त्रास ग्रामस्थांसह कामगार व जनावरांना होणार आहे. याबाबत संबंधितांची कणकवली पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी करावी, अशी मागणी तिवरे येथील उमेश राजाराम प्रभुदेसाई कणकवली पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, आमची तिवरे येथील गावठणवाडी येथे जमीन असून वीज वितरण अधिकारी हे माझी व माझे अन्य हिस्सेदार यांची कोणत्याही प्रकारची संमती न घेता राजरोसपणे आमच्या मालकीच्या जमिनीत पोल टाकून सदरचे पोल मधोमध पुरत आहेत. वीज वितरण विभागाने याबाबत आमची कोणतीही लेखी अथवा तोंडी परवानगी घेतलेली नाही. आम्हांला त्या हायहोल्टेज लाईनबाबत रितसर माहिती न देता विदयुत वितरण कंपनी दांडगाईने पोल टाकण्याचे काम करु पाहत आहेत. तर आम्हाला आडकाठी केल्यास सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करु, अशी विदयुत वितरण कंपनीचे अधिकारी धमकी देत आहेत.
आम्ही आमच्या जमिनीत मौल्यवान किंमतीची झाडे लावणार आहोत. तिवरे कदमवाडी येथे जाणारा रस्ता हा आमच्या मालकीच्या जमिनीतून गेलेला आहे. सदरच्या जमिनीतून हायहोल्टेज लाईन ओढली गेल्यास आमची जनावरे तसेच ग्रामस्थ, कामगार यांना धोका निर्माण होणार आहे. याबाबत संबंधीतांना प्रत्यक्ष आपल्या ठिकाणी बोलावून चौकशी करावी असेही अर्जात म्हटले आहे.










