भाषेच्या प्रश्नाशी सर्व समाज जोडला जायला हवा

डॉ. दीपक पवार यांचे प्रतिपादन
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: September 29, 2025 14:25 PM
views 96  views

कणकवली : आपली भाषा संपली तर आपणही संपणार आहोत हे ज्यांना माहित नाही तेच लोक भाषेच्या प्रश्नापासून दूर राहत आहेत. भाषा संपली तर साहित्य संपेलच, परंतु आपल्या भाषेची संस्कृती संपून आपणही संपून जाऊ. यामुळे मराठी भाषेच्या प्रश्नाशी सर्व मराठी समाज जोडला जायला हवा, असे प्रतिपादन ज्येष्ठ भाषा अभ्यास दीपक पवार यांनी केले.

समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि सहयोग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वसई येथे यावर्षीचे पाचवे समाज साहित्य भाषा विचार संमेलन प्रा. डॉ. दीपक पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम कलमठ - गोसावीवाडी अक्षय सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर आणि समाज साहित्य प्रतिष्ठानच्या विश्वस्त, समीक्षक प्रा.संजीवनी पाटील यांच्या हस्ते प्रा.पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. पवार यांनी भाषेच्या प्रश्नाशी सर्व साहित्यिकांनी जोडून घ्यायला हवे, असेही आग्रहाने सांगितले. 

यावेळी मराठी भाषा अभ्यास केंद्राचे प्रा. प्रकाश परब, श्रीमती साधना, समाज साहित्य प्रतिष्ठानचे संस्थापक अजय कांडर, प्रतिष्ठानचे इतर पदाधिकारी ॲड. मेघना सावंत, हरिश्चंद्र भिसे, संजय तांबे, निशिगंधा गावकर, सुरेश पाटील, सत्यवान साटम आदी उपस्थित होते.

अजय कांडर म्हणाले, समाज साहित्य प्रतिष्ठान ही साहित्य चळवळ एक सकारात्मक सांस्कृतिक राजकारण करण्यासाठी साहित्य चळवळीचे काम करते. समाज असतो म्हणून साहित्याची निर्मिती होते आणि समाज,साहित्य भाषेची जोडला गेलेला असतो. त्यामुळे या वर्षाच्या समाज साहित्य भाषा विचार संमेलनाच्या अध्यक्षपदी भाषा अभ्यासक दीपक पवार यांची खास निवड करण्यात आली. त्यांनी गेली अनेक वर्ष भाषेविषयी केलेले काम अजोड असे आहे. अशा सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या व्यक्तींच्या पाठीमागे राहणे आणि त्यांचा सन्मान करणे ही आपलीही जबाबदारी आहे.

संजीवनी पाटील म्हणाल्या, यावर्षीच्या संमेलनाच्या अध्यक्षपदी दीपक पवार यांचे नाव आमच्या संस्थेचे मार्गदर्शक अजय कांडर यांनी सुचवले आणि आम्ही सगळ्यांनी त्याला अनुमती दिली. कारण दीपक पवार यांचे भाषेविषयीचे काम असा गौरव करणारेच आहे. त्यामुळे त्यांचा इथे येथोचित सत्कार करता आम्हाला आनंदच होत आहे.