कणकवलीत भक्तीमय वातावरणात गणपतींचं विसर्जन

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: September 07, 2025 15:39 PM
views 143  views

कणकवली : गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरया..पुढच्या वर्षी लवकर या...गणपती चालले गावाला...चैन पडेना आम्हाला...एक दोन तीन चार...गणपतीचा जयजयकार...असा जयघोष अन् ढोल-तशांच्या गजरात, जडअं:तकरणाने लाडक्या गणरायाला कणकवली शहरासह तालुक्यात निरोप देण्यात आला. विसर्जनस्थळी भाविकांची गर्दी लोटली होती.  शहरातील गणपती सानासह अन्य गणेश घाटांवर गणपतींचे विसर्जन करण्यात आले. कलमठ, फोंडाघाट, तळेरे, खारेपाटण यासह अन्य गावातील गणेश घाटांवर गणपतींचे विसर्जन करण्यात आले.  

शनिवारी सायंकाळी घरोघरी गणेशाची उत्तरपूजा मोठ्या भक्ती भावाने झाली. त्यानंतर गणेशभक्त लाडक्या बाप्पा  निरोप देण्यासाठी बाहेर पडले. गणेश भक्तांनी डोक्यावरुन तर सजवलेल्या वाहनांमधून स्पीकरवर गणेशाच्या गाण्यांनी मिरवणुकीने गणेश मूर्ती घाटापर्यंत आणल्या. विसर्जन मिरवणुकीत गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या...च्या घोषणा आणि फटाक्यांची आतषबाजी सुरू होते. निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी, असे बोल गणेशभक्तांचा मुखी होते.  घाटांवर गणेशमूर्ती एका ओळीत ठेवून सार्वजनिक आरती करण्यात आली. जड अंतकरणाने गणेशमूर्त्या विसर्जित करण्यात आल्या. प्रत्येकाने आणलेल्या लाह्या, फळांच्या फोडी, खव्याचे मोदक, पेढे यांचा प्रसाद एकत्रित करून आलेल्या भाविकांना 'निरोपाचा प्रसाद' म्हणून वाटण्यात आला.  

कणकवली शहरातील मानाचा समजल्या जाणाºया संतांच्या गणपतीची वाजत-गाजत मिरवणूक काढून गणपती साना येथे जानवली नदीपात्रात विसर्जन करण्यात आले. कणकवली नगरपंचायतीने गणपती सान्याकडे विसर्जनासाठी आलेल्या गणपती व गणेशभक्तांवर मंडपावरून पुष्पवृष्टी केली. विसर्जनाचा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची याठिकाणी गर्दी लोटली होती. तालुक्यातील महात्त्वाच्या गणेश घाटांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गणपती साना येथील विसर्जन व्यवस्थेची अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी पाहणी केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी घन:श्याम आढाव, पोलीस निरीक्षक तेजस नलावडे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.