
कणकवली : कलमठ बाजारपेठेतील एका इमारतीच्या गाळ्यामध्ये बिअर बार व परमिट रुम सुरू करण्याबाबतचा अर्ज सुमंगल सुरेश सावंत यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे दिला आहे. ही इमारत शाळेच्या परिसरात आहे. त्यामुळे त्यांचा हा अर्ज फेटाळून लावून दारूची विक्री करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे कलमठ ग्रा. पं. सदस्य तथा शिवसेना उबाठा पक्षाच्या युवासेनेचे कलमठ शहरप्रमुख धीरज मेस्त्री यांनी निवेदनाद्वार केली आहे.
जि. प. कलमठ बाजारपेठ शाळेपासून काही अंतरावर असलेल्या एका इमारतीमध्ये एफएलबीआर बिअर बार व पामिट रूम सुरू करण्याचा अर्ज सुमंगल सावंत यांनी राज्य उत्पादन विभागाकडे दाखल केलेला आहे. त्याला तीव्र ग्रामस्थांचा विरोध आहे. इमारतीच्या परिसरात शाळा आहे. विद्यार्थ्यांचा रोजचा वावर असतो. याठिकाणी दारू विक्रीचे दुकान सुरू करणे विद्यार्थ्यांसाठी हानीकारक आहे. याशिवाय या इमारतीलगत पुरातन विठ्ठल-रखुमाई देवस्थान आहे. मंदिरात भाविक दररोज दर्शनासाठी येतात. धार्मिक स्थळाच्या अगदी जवळ दारू विक्रीस परवानी दिल्यास ग्रामस्थांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील.
तसेच या परिसरात पिंपळपार आहे. पिंपळपार परिसरात शिवसेना मत्रिमंडळ सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा उपक्रम राबवत असते. या परिसरात बिअर बार व परमिट रुमला परवानागी देणे सामाजिकहिताचे नाही. कलमठ हा सुशिक्षित, सुसंस्कृत लोकवस्तीचा भाग असल्याने दारूचे दुकान सुरू झाल्यास गावातील सामाजिक वातावरण बिघडण्याची शक्यता असून मद्यपींमुळे वादाचे प्रसंग घडण्याची शक्यता आहे. कलमठ गाव हे कणकवली शहरालगत आहे. गावापासून काही अंतरावर बिअर बार असल्याने बाजारपेठेत बिअर बार व परमिट रुमची आवश्यक नाही. बिअर बार व परमिट रुमला राज्य शुल्क विभागाने परवानगी दिल्यास कलमठ बाजारपेठ परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा बिघडण्याचे प्रसंग घडण्याची शक्यता आहे. त्या स्थितीला संबंधित विभाग जबाबदार असेल. या सर्व बाबींचा विचार करून कलमठ बाजारपेठेतील एफएलबीआर २ बिअर बार व परमिट रुमच्या परवानगीच्या अर्ज फेटाळण्याचा यावा, अशी विनंती श्री. मेस्त्री यांनी केली आहे. निवेदनाची पत्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सहाय्यक आयुक्तांना दिले आहे.