
कणकवली : तळेरे बाजारपेठेतील एका सलून समोर पाय घसरून पडून सुधीर महादेव भाटकर (६०, रा. हसनाडी, ता. देवगड) यांचा मृत्यू झाला. याबाबतची खबर दयानंद सखाराम वाडेकर (रा. तळेरे) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली. ही घटना गुरुवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली.
सुधीर भाटकर हे गेली पंचवीस वर्षे तळेरे बाजारपेठेतील राज हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होते. गुरुवारी सकाळी सुधीर हे कामाला जात होते. त्यावेळी तळेरे बाजारपेठेतील एका सलूनसमोर पाय घसरल्याने ते पडले. त्यांची काहीही हालचाल होत नसल्याने दयानंद वाडेकर यांनी त्यांना कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून सुधीर भाटकर यांना मयत घोषित केले. याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.