
कणकवली : कणकवलीत सात दिवसांच्या गणरायांसह माहेरवाशीण गौरीला मंगळवारी भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. लाडक्या बाप्पाला निरोप देताना अर्थातच गणेभक्तांचेही डोळे पाणावले होते. कणकवली शहरात जानवली नदीवरील गणपतीसाना, मराठा मंडळानजीक, नाथ पै बंधारा, बांधकरवाडी गणपतीसाना आदी ठिकाणी विसर्जन करण्यात आले.
कणकवली नगरपंचायतीने विसर्जनाबाबत विद्युत रोषणाई, सुरक्षितता आदींची चोख व्यवस्था केली होती. तालुकाभरात नद्या, ओहोळ, विहिरी आदी ठिकाणी गणरायांचे विसर्जन करण्यात आले. यावेळी गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या असा गजर ठिकठिकाणी घुमत होता. तर विसर्जनप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.