चाकरमान्यांसाठी एसटी बसेस सज्ज

परतीच्या प्रवासासाठी २५८ गाड्यांचे बुकिंग
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: September 02, 2025 13:41 PM
views 129  views

कणकवली : सात दिवसांच्या गणरायांचे मंगळवारी विसर्जन झाल्यानंतर आता बहुतांश चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळही सज्ज झाले आहे. गणेशोत्सवात मुंबईतून सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकरमानी, गणेशभक्तांसाठी राज्य परिवहन सिंधुदुर्ग विभागाने तब्बल १२०० गाड्यांची व्यवस्था केली होती. आता गणेशोत्सव आटोपून मुंबई व अन्यत्र जाणाऱ्या चाकरमान्यांच्या मदतीसाठीही एसटी प्रशासन धावले आहे. मुंबई, पुणे आदी ठिकाणी जाण्यासाठी आतापर्यंत २५९ बसेसचे बुकिंग झाले असून या गाड्या मंगळवार, २ सप्टेंबरपासून धावू लागल्या आहेत. आज मंगळवारी दिवसभरात २० बसेस मुंबईच्या दिशेने‌धावत आहेत.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील चाकरमान्यांच्या प्रवासाची व्यवस्था केली आहे. चाकरमानी रेल्वेसोबत एसटी प्रवासालाही पसंती देत असल्याचे लक्षात घेऊन एसटी महामंडळानेही सकारात्मक पाऊल उचलले आहे. गणेशोत्सव सुरु होण्यापूर्वीच मुंबईला जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी जवळपास २०० एसटी गाड्या फुल्ल झाल्या होत्या. हाच आकडा आता २५९ एवढा पोहोचला आहे. यामध्ये ३ सप्टेंबरला मुंबईला ११८ तर पुण्याला ७ बसेस धावणार आहेत. ४ सप्टेंबरला मुंबईला ७५ तर पुण्याला ३ बसेस रवाना होणार आहेत. ७ सप्टेंबरला मुंबईकडे ३५ तर पुण्याला एक बस जाणार आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार आणखीन गाड्या उपलब्ध करून देणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे.