
कणकवली : कणकवली शहरासहीत ग्रामीण भागातील रस्त्यांवर पडलेले खड्डे १५ ऑगस्टपर्यंत बांधकाम विभागाने बुजवावेत. तसेच गणेशोत्सव कालावधीत विजपुरवठा अखंडित ठेवण्याच्यादृष्टीने महावितरणने नियोजन करावे. आरोग्य विभागाने रेल्वेस्टेशन, बसस्थानकांवर आरोग्य पथके तैनात ठेवावीत, आरोग्य पथके रेल्वे स्टेशने, बस स्थानक येथे पहिल्या तीन दिवसाकरिता तैनात केली जातात. परंतु गणेशोत्सव होईपर्यंत ही पथके तैनात ठेवता येतील का? या दृष्टीने आरोग्य विभागाने नियोजन करावे, अशा सूचना प्रांताधिकारी जगदिश कातकर यांनी दिल्या.
गणेशोत्सव २०२५ पूर्वतयारीसाठी शांतता समितीची बैठक प्रांताधिकारी जगदिश कातकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी तहसीलदार दीक्षांत देशपांडे, निवासी नायब तहसीलदार मंगेश यादव, पोलीस निरीक्षक अतुला जाधव व इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपंचायत प्रशासनाला सूचना देण्यात आल्या. १५ ऑगस्टपूर्वी ग्रामीण व शहरी भागातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवावेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने महामार्ग व सर्व्हिस रोड व इतर खड्डे बुजवावेत. गणपती साना व इतर रस्त्यांवरील लाईट व्यवस्था करण्यासंदर्भात, सणांच्या कालावधीत भारनियमन अथवा विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी वीज महावितरणने घ्यावी, अशी सूचना कातकर यांनी केली.
राज्य परिवहन महामंडळाच्या कणकवली बस स्थानकावरून सुटणाऱ्या व येणाऱ्या बसेसविषयी आढावा घेण्यात आला. शहरांमध्ये टूव्हीलर, फोर व्हीलर पार्किंगबाबत नियोजन करावे. त्या अनुषंगाने प्रसिद्धीसाठी माहिती द्यावी. टूव्हीलर, फोरव्हीलर पार्किंगबाबतचे बोर्ड करून त्याचे तातडीने नियोजन करावे, अशा सूचना नगरपंचायत व पोलीस यंत्रणेला प्रांताधिकारी यांनी दिल्या.