
कणकवली : गोव्याहून मुंबईच्या दिशेने 'रॉंग साईड'ने कंटेनर घेऊन जात असलेल्या अजय कुमार शिवबहादुर यादव (३२, रा. उत्तर प्रदेश) याला महामार्ग पोलीस केंद्र कसाल कणकवलीच्या पोलिसांनी पाठलाग करून अडवले व त्यानंतर कणकवली पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीसी चौकीत अजयकुमार हा मद्यपान करून असल्याचे निष्पन्न झाले. ही कारवाई वागदे येथे शुक्रवारी सकाळी १०.१५ वा. सुमारास करण्यात आली.
अजय कुमार हा कंटेनर घेऊन मुंबईच्या दिशेने जात होता. मात्र तो विरुद्ध 'लेन'वरून कंटेनर चालवत असल्याबाबत जागरूक नागरिकांनी महामार्ग पोलीस केंद्र कसाल कणकवली यांना कळवले. त्यानुसार महामार्ग पोलीस केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश गवस, हवालदार योगेश लाड, एकनाथ सरमळकर, कॉन्स्टेबल रवी इंगळे, सागर परब आदींनी पोलिसी वाहनाने सदर कंटेनाचा पाठलाग केला. अखेरीस वागदे येथे कंटेनर अडवण्यात पोलिसांना यश आले. अजयकुमार याच्याविरोधात मद्यपान करुन व धोकादायक पद्धतीने वाहन चालविल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.