
सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर गतिमान प्रशासन होण्यासाठी शंभर दिवसात कृती आराखडा बनवण्यात आला होता या कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत विविध लोकाभिमुख उपक्रम राबविण्यासोबतच प्रशासकीय कामकाजात गतिमानता राखण्यात कणकवली तालुक्याने आघाडी मिळविली आहे. जिल्हास्तरावर याबाबत झालेल्या मूल्यमापनातून विभागस्तरासाठी निवड झालेल्यात कणकवली प्रांताधिकारी, तहसील कार्यालय व पंचायत समितीची निवड करण्यात आली आहे.
शासनाच्या १०० दिवस कृती आराखडा कार्यक्रमात कणकवली प्रांताधिकारी व तहसील कार्यालयाने जिल्ह्यात यशस्वीपणे उपक्रम राबविला आहे.
तहसील कार्यालयाने या कालावधीत संकेतस्थळ स्थापन केले. तहसील कार्यालयाकडून विविध प्रकारचे दाखले वेळेत उपलब्ध करण्यात आले. त्यासाठीचे नियोजन करत त्रुटी नसलेले दाखले एका दिवसांत देण्याबाबतचा उपक्रमही राबविण्यात आला. १ एप्रिलपासून ६०० हून अधिक दाखलेही वितरित करण्यात आले.
तहसील कार्यालयाकडून राष्ट्रीय कुटुंब लाभयोजनेंतर्गत लाभार्थ्यांचा शोध घेत, त्यांना लाभ देण्यात आला. तसेच स्वच्छतागृहे व कार्यालयीन स्वच्छता, मुदतबाह्य अभिलेख नष्ट करणे, जुन्या वाहनांचे निर्लेखन, तक्रार निवारण, लोकशाही दिन, कार्यालयीन सोई-सुविधा, चौकशी कक्ष, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी, व्यापारी बैठक असे विविध उपक्रम राबविण्यात आले. ई ऑफिस प्रणाली, अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, एआय तंत्रज्ञानाचा वापर, अशा माध्यमातून अधिक गतिमानता वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
कणकवली प्रांताधिकारी कार्यालयाकडूनही विविध प्रकारचे दाखले उपलब्ध करून देण्यासोबतच प्रशासकीय कामकाजात गतिमानता वाढविण्यासाठी उपक्रम राबविण्यात आले. लोकाभिमुख व प्रशासकीय कामकाजासोबतच कार्यालयीन स्वच्छता, परिसर सुशोभिकरण असे उपक्रम राबविण्यात आले.
पंचायत समितीद्वारे यादिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत गावपातळीपर्यंत लोकाभिमुख कामकाज, तक्रार निवारण, कार्यालयीन सुशोभिकरण, अभ्यागतांसाठी तातडीने सुविधा असे विविध, बचतगटांच्या पदार्थ विक्रीसाठीचा उपक्रम, उमेदच्या माध्यमातून प्रशिक्षण असे उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आले.
या साऱ्या उपक्रमांच्या माध्यमातूनच जिल्ह्यातून या १०० दिवसांच्या कृती आराखडा उपक्रमांतर्गत विभागस्तरासाठी कणकवली तहसील कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय व पंचायत समितीची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे प्रांताधिकारी जगदिश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे व गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांचे अभिनंदन होत आहे.