कणकवली न.पं. सफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन !

Edited by: उमेश बुचडे
Published on: March 27, 2024 06:51 AM
views 486  views

कणकवली : कणकवली नगरपंचायत मधील सफाई कर्मचाऱ्यांना मागील तीन महिने वेळेवर पगार होत नाही.  आज 27 मार्च आली तरी देखील पगार झाला नाही. म्हणून कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे.

आम्ही खायचे काय ? बाहेरून येणाऱ्या कामगारांना जाण्या येण्यासाठी खर्च लागतो तो कसा  करायचा ?सण उत्सव तोंडावर आहेत. तरी देखील आमचे पगार झाले नाहीत. घर कसे चालणार ? आमचे असा प्रश्न विचारत कणकवली नगरपंचायत सफाई कर्मचारी गार्डन कर्मचारी व इतर कर्मचारी मिळून 70 कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. त्यावेळी मुख्याधिकारी विशाल खत्री यांनी तातडीने सर्वांना बोलावले असून कर्मचाऱ्यांची प्रतिनिधी व ठेकेदार यांच्यासोबत चर्चा करत आहेत. पण कामगारांनी आम्हाला पगार मिळाला नाही तर आम्ही काम बंद आंदोलनावर ठाम असल्याचे सांगितले.


याआधी कर्मचाऱ्यांनी 26 मार्चपर्यंत आपला पगार व्हावा यासाठी नगरपंचायत ला पत्र दिले होते अन्यथा आपण 27 मार्चला आंदोलन करणार असल्याचे पत्र देखील दिले होते. त्याच अनुषंगाने आज आपण हे आंदोलन करत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. यासंबंधी  ठेकेदाराने अधिकारी यांची बदली झाल्यामुळे कागदपत्रांची पूर्तता होऊ शकली नसल्याने  पगाराला उशीर झाल्याचे कारण सांगितले. यासंबंधी मुख्याधिकारी, ठेकेदार आणि कर्मचारी यांची कातडीची बैठक मुख्याधिकारी दालनात सुरू असल्याने त्याच्यावर काय तोडगा निघतो हे आता पहावे लागणार आहे.