
कणकवली : कणकवली शहरातील कनकनगर येथील सौ. समृद्धी कोरगावकर यांच्या घरी झालेल्या घरफोडीप्रकरणी कणकवली पोलीस व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस यांनी संयुक्त मोहीम राबवत चोरटा संतोष वसंत सुतार (43, संगमेश्वर - रत्नागिरी) याला सोमवारी दुपारी १. ३० वा सुमारास पणजी - गोवा येथील मार्केटमधून अटक केली. संशयित संतोष सुतार हा घरफोडीप्रसंगी नजीकच्या एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. त्याच आधारे कणकवली पोलीस व एलसीबी पोलिसांचे संयुक्त पथक चोरट्यापर्यंत पोहोचले. संतोष याला अटक करून सायंकाळच्या सुमारास कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आले. सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे.
सदरची घरफोडी रविवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली होती रुग्णालयीन कर्मचारी असलेल्या समृद्धी कोरगावकर या कामानिमित्त शनिवारी सायंकाळच्या सुमारास कामावर निघून गेल्या होत्या. तर त्यांचे पती, सासरे व मुलगा मालवण येथे गेले होते. परिणामी त्यांचे राहते घर शनिवारी सायंकाळनंतर बंद होते. हीच संधी साधून चोरट्याने शनिवारी रात्री समृद्धी यांच्या घराला लक्ष केले होते. चोरट्याने समृद्धी यांचे घर फोडून जवळपास साडेतीन लाखांचा मुद्देमाल चोरला होता. दरम्यान संतोषला अटक झाल्यामुळे कणकवली शहरात मागील काही दिवसांत ज्या घरफोड्या झाल्या आहेत त्यांचाही शोध लागण्याची शक्यता आहे.
कारवाईत कणकवलीचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, हवालदार पांडूरंग पांढरे, एलसीबीचे उपनिरीक्षक रामचंद्र शेळके, समीर भोसले, हवालदार आशिष जमादार, डॉमनेट डिसोजा, जॅक्सन घोन्साल्व्हीस आदी सहभागी झाले होते.