स्वच्छतेत कणकवली शहराला ODF ++ मानांकन !

Edited by: उमेश बुचडे
Published on: January 06, 2024 11:49 AM
views 405  views

कणकवली : स्वच्छ सर्वेक्षण २०२3 अंतर्गत केंद्र सरकार कडून राबिविण्यात येत असलेल्या हागणदारी मुक्त शहरांच्या सर्वेक्षणात यशस्वीपणे प्रमाणित होऊन कणकवली शहराने ओडीएफ ++ मानांकन मिळवले. कणकवली शहराने २०१६ पासून हागणदारी मुक्त शहर म्हणून आपले सातत्य टिकवण्यात यंदाही यश मिळवले आहे.


असे शहर ज्यात कोणतीही व्यक्ती उघड्यावर शौचास जात नाही, सर्व शहरवासीयांना शौचालयाची सुविधा उपलब्ध आहे, शहरात लोकसंखेच्या प्रमाणात पुरेशी सामुदायिक व सार्वजनिक शौचालये आहेत. तसेच सर्व सामुदायिक तथा सार्वजनिक शौचालायापैकी २५% शौचालय सर्वोत्तम दर्जाची आहेत.


शहरात निर्माण होणाऱ्या सर्व मैला साठीचा व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे, शहराचा स्वताचा स्वतंत्र मैला व सांडपाणी प्रकल्प कार्यान्वित आहे, शहरातील सर्व सार्वजनिक शौचालये गुगल नकाश्यावर (SBM TOILET) नोंदणीकृत आहेत. वरील निकषांचे मुल्याकन करण्यासाठी केंद्रीय पथकाने ऑगस्ट २०२३ मध्ये शहरात अचानक धडक दिली होती. त्यांनी शहरातील सर्व परिसरांची तसेच सर्व सार्वजनिक व सामुदायिक शौचालये आणि  सांडपाणी प्रकल्पांचे मुल्याकन करण्यात आले.


त्यानंतर या पथकाद्वारे केंद्राकडे अहवाल सादर करण्यात आला होता. कणकवली नगरपंचायतने केलेले काम व हागणदारी मुक्त शहराचा दर्जा टिकवण्यासाठी केलेले नियोजन कामी आले व केंद्राला मिळालेला अहवाल सकारात्मक असल्याने कणकवली शहराला ओडीएफ++ शहर म्हणून प्रमाणित केले. या नामांकनासाठी प्रशासनाने व मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतीच्या टीम ने विशेष मेहनत घेतली होती.