'राजकुमार' परतला वडिलांकडे !

महेश देसाई यांनी घडविली भेट !
Edited by: उमेश बुचडे
Published on: February 27, 2024 10:44 AM
views 294  views

कणकवली : सामाजिक कार्यकर्ते व उबाठा सेनेचे निष्ठावंत शिवसैनिक महेश देसाई यांचे प्रसंगावधान राखत छत्तीसगड मधून हरवलेल्या मुलाला नातेवाईकांशी भेट घडवून आणली आहे.छत्तीसगड मधून हरवलेल्या राजकुमार मरकाम या युवकाला  वडिलांच्या स्वाधीन केले.

महेश देसाई नेहमीप्रमाणेच बेळणे येथील आपल्या बागेत जात असताना एक तरुण त्यांना जानवली येथे भुकेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी त्याला हाॅटेल मधे खाऊपिऊ घातले व सहज चौकशी केली असता सदर तरुण राजकुमार मरकाम, बैरामपूर छत्तीसगड येथील असल्याचे समजले. तो खूप दिवसांचा भुकेला होता व घरातून कोणालाही न सांगता निघून आला होता. त्याला फोन नंबर विचारला असता त्याने आपल्या भावाचा नंबर सांगितला. त्यावर महेश देसाईंनी फोन लावला असता त्याच्या भावाने तो फोन उचलला, त्यांना सुखद धक्का बसला.

सदर मुलाला त्याचे नातेवाईक उत्तर प्रदेश वाराणसी पर्यंत शोधून गेले होते. त्यांनी महेश देसाई चे आभार मानले व आपण येईपर्यंत सदर मुलाला आपल्या कडे ठेवून घेण्याची विनंती केली . कारण छत्तीसगड येथून येईपर्यंत यायला तीन दिवस लागणार होते. महेश देसाईंनी सदर मुलाला तीन दिवस आपल्या बागेमधे ठेवून घेतले. परवा त्याचे वडील व भाऊ आले असता ओळख पटवून त्यांच्या ताब्यात दिले. मुलाला बघताच त्याच्या वडीलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांनी महेश देसाईचे आभार मानले. महेश देसाई च्या प्रसंगावधानाने एका मुलाची त्याच्या कुटुंबियांसह भेट घालून दिल्यामूळे त्यांचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे.