कणकवलीत महायुतीवर शिक्कामोर्तब..?

कमानीवरील 'ते' फोटो ठरताहेत लक्षवेधी
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: November 10, 2025 15:20 PM
views 626  views

कणकवली : नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षातर्फे कणकवली शहरातील ढालकाठी येथे प्रचार संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयासमोर एक कमान उभारण्यात आली असून त्यावर भाजपच्या नेतेमंडळींसह शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचेही फोटो आहेत. त्यामुळे कणकवली नगरपंचायत निवडणूक भाजप, शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष युती करून लढणार आहेत की काय, असा प्रश्न जनतेमधून विचारला जात आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने विशेषतः भाजप व शिंदे शिवसेना या दोन्ही पक्षांच्या नेते मंडळींनी सातत्याने स्वबळाची भाषा केली. दुसऱ्या बाजूला कणकवली शहरात भाजपच्या विरोधात शहर विकास आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्नही काही पक्षांच्या मंडळींनी केला होता. मात्र अलीकडेच खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन महायुतीच्या माध्यमातूनच निवडणुका लढवल्या जाव्यात अशी इच्छा व्यक्त केली होती. साहजिकच स्वबळावर निवडणूक लढवण्याचा व शहर विकास आघाडी स्थापन करण्याचा मुद्दा सध्या तरी मागे पडलेला दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रचार संपर्क कार्यालयाबाहेर असलेल्या कमानीवरील नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, नीतेश राणे, प्रमोद जठार, प्रभाकर सावंत, समीर नलावडे या भाजपच्या मंडळींसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, आमदार निलेश राणे यांचे फोटो सध्या कणकवलीकरांचे लक्ष वेधून घेत आहेत.