दिंड्या, पताका, टाळ मृदुंगाच्या गजराने कणकवली 'विठ्ठलमय'

हजारो वारकरी दिंडीत सहभागी | पायी चालत पालकमंत्री नितेश राणे यांचा उत्स्फूर्त सहभाग
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: November 09, 2025 20:28 PM
views 152  views

कणकवली : संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० वा जन्मोत्सव आणि संत तुकाराम महाराज यांच्या ३७५ वा वैकुंठगमन उत्सवानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा वारकारी संप्रदायातर्फे कणकवली शहरातून भव्य दिव्य काढलेली वारकरी दिंडी लक्षवेधी ठरली. कणकवलीकरांनी 'याची डोही याचे देही' वारकऱ्यांची दिंडी पाहिली. दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी  श्रीदेव विठ्ठल रखुमाईच्या नामाचा जयघोष करीत शहरातील वातावरण विठ्ठलमय केले. वारीत पालकमंत्री नितेश राणे हे देखील सहभागी झाले. विठ्ठल रखुमाईची पालखी खाद्यावर घेऊन मंत्री नितेश राणे यांनी वारीत सहभाग घेतला. 

विठूच्या नामाचा जयघोष…टाळ-मृदंगाचा गजर…हाती भगवा झेंडा…महिला वारकºयांचा डोक्यांवर तुळशी वृंदावन…विठ्ठल व संतांच्या नामजपात तल्लीन झाले वारकरी…असे चित्र कणकवलीत रविवारी पहायाला मिळाले. सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्गतर्फे संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७५० वा जन्मोत्सव आणि संत तुकाराम महाराजांचा ३७५ वा वैकुंठगमन उत्सवानिमित्ताने भव्यदिव्य वारकरी दिंडी (पालखी सोहळा) कणकवलीत पार पडला. या पालखी सोहळ्याच्यानिमित्ताने सर्व वारकरी एस.टी. वर्कशॉप येथील गणेश मंदिरात रविवारी सकाळी जमले. त्यानंतर विठूच्या नामाचा जयघोष अन् टाळ-मृदुंगाच्या गजरावर मंदिराकडून वारकºयांनी प्रस्थान केले.

जिल्हा वारकारी संप्रदायातर्फे अध्यक्ष ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर, महाराज यांच्या नेतृत्वाखाली ही वारकरी दिंडी भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली होती यासाठी हजारो वारकरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून कणकवलीत दाखल झाले होते.या दिंडीत विणेकरी, वारकरी पताकाधारी, मृदुंगमणी, डोक्यावर तुळसी वृंदावन घेतलेल्या महिला, कळस घेतलेल्या महिला,टाळकरी यांच्यासह हजारोंच्या संख्येने वारकरी विठ्ठल नामाचा गजर खरात वारीत चालत होते.या वारीमध्ये पालकमंत्री नितेश राणे, यांनी विठ्ठल पूजन करून पालखी खांद्यावर घेऊन वारीत सहभाग घेतला. त्यांच्या सोबत कणकवली माजी नगरध्यक्ष समीर नलावडे, सिंधुदुर्ग भजन संस्थेचे अध्यक्ष संतोष कानडे, माजी सभापती सुरेश सावंत, भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संजय मालंडकर,  वारकरी सांप्रदायाचे कार्याध्यक्ष , पत्रकार संतोष राऊळ, सेक्रेटरी गणपत घाडीगावकर,उपाध्यक्ष राजू राणे कोषाध्यक्ष प्रभू गावकर,यांच्यासह वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

वारीत मंत्री नितेश राणे यांनी पालखीची भोई होत आपल्या खांद्यावर पालखी  घेतली. त्यानंतर त्यांनी टाळ वाजवून विठूरायासह संतांच्या नामाचा जयघोष केला. ‘विठ्ठल माझा, विठ्ठल माझा, मी विठ्ठलचा असा’ जयघोष वारकºयांनी केला. गणेश मंदिर येथून सकाळी निघालेल्या वारी छत्रपती शिवाजी महाराज चौक, आप्पासाहेब पटवर्धन चौक, बाजारपेठमार्गे प. पू. भालचंद्र महाराज संस्थानात दाखल झाली. याठिकाणी वारीची सांगता करण्यात आली. या ठिकाणी एकाच वेळी मृदुंग आणि टाळाचा गजर करण्यात आला हरिभजन करण्यात आले. यावेळी सहभाग घेतलेल्या वारकऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात आली. मृदुंग वादकांना प्रमाणपत्र देण्यात आली. भक्तिमय असा वातावरणात कणकवलीनगरी निनादून गेली.