
कणकवली : बरे वाटत नसल्याने पॅरासिटमलची गोळी व सोबत 'स्प्राईट' हे शीतपेय प्राशन केल्यानंतर अत्यवस्थ वाटू लागल्याने कणकवलीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या गुरुदेव यशवंत परब (वय ३४, रा .हरकुळ खुर्द - गावडेवाडी या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
गुरुदेव याने गुरुवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास जेवण केले. त्यानंतर बरे वाटत नसल्याने त्याने पॅरासिटमलची गोळी घेतली. सोबत त्याने स्प्राईट हे शीतपेयही प्राशन केले. रात्री ११ वा. सुमारास त्याला अत्यवस्थ वाटू लागले. कुटुंबिय व शेजाऱ्यांनी त्याला कणकवलीतील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता रात्री १.४५ वा. सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत गुरुदेव यांचे शेजारी संजय रावले यांच्या खबरीनुसार घटनेची कणकवली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.










