
कणकवली : उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या राजेंद्र बळीराम गावडे (५२, रा. लागले) यांचे प्लेटलेट्स अत्यंत कमी असतानाही तसेच त्यांचा ब्लडप्रेशर कमी झालेला असतानाही केवळ गोळ्या, औषधे देऊन घरी पाठवल्यानंतर गावडे यांचा घरात गेल्यानंतथ मृत्यू झाल्याच्या घटनेबाबत अखेर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेले जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी संतप्त ग्रामस्थांशी चर्चा केली. मयत गावडे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी डॉ. पाटील यांनाही दिला. अखेर तपासणी करून गावडे यांना घरी पाठवणाऱ्या 'त्या' महिला डॉक्टरने गावडे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याचे मान्य केले. तसेच मयत गावडे यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरीत सामावून घेण्यासाठी आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडे शिफारस करणार असल्याचे आश्वासन पाटील यांनी दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी हे आंदोलन मागे घेतले.
गावडे हे गुरुवारी सायंकाळी तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांना एका महिला डॉक्टरने उद्या गुरुवारी सकाळी रुग्णालयात या, असे सांगितले. त्यानुसार गावडे हे कुटुंबियांसह शुक्रवारी सकाळी ९ वा. सुमारास उपजिल्हा रुग्णालयात आले. त्या महिला डॉक्टरने त्यांना काही चाचण्या करायला सांगितल्या. त्यामध्ये गावडे यांचे प्लेटलेट्स 36000 एवढे झाले होते तर त्यांचा ब्लडप्रेशरही कमी झाला होता. तरीही त्या महिला डॉक्टरने गावडे यांना ऍडमिट करून न घेता गोळ्या, औषध देऊन घरी पाठवले. मात्र घरी आलेले गावडे काही वेळातच अत्यवस्थ बनले. त्यांना पुन्हा एकदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तपासणीअंती त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ग्रामस्थांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेऊन त्या महिला डॉक्टरवर कारवाई करा व गावडे यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्या, अशी मागणी करत डॉक्टरांना घेराव घातला होता.










