
कणकवली : प्लेटलेट्स खूप कमी होऊनही कणकवली उपजिल्हा रुग्णालयात ऍडमिट न करता केवळ गोळ्या औषधे देऊन घरी पाठवलेल्या राजेंद्र बळीराम गावडे (वय ५३, रा. वागदे) यांचा घरी गेल्यानंतर मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. घडल्या प्रकारामुळे संतप्त झालेल्या वागदे गावातील ग्रामस्थांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. राजेंद्र यांचे प्लेटलेट्स एवढे कमी झालेले असतानाही त्यांना एडमिट का करून घेतले नाही, असा सवाल ग्रामस्थांनी करत उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्सना धारेवर धरले. राजेंद्र यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या डॉक्टर्सवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला. घडल्या प्रकारामुळे उपजिल्हा रुग्णालयातील वातावरण काहीसे तंग झाले आहे.
राजेंद्र गावडे हे हे बुधवारी सायंकाळनंतर उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना 'उद्या या' असे सांगितले. त्यानुसार राजेंद्र हे आज गुरुवारी सकाळी ९ वा. सुमारास उपजिल्हा रुग्णालयात आले डॉक्टरांनी त्यांना काही चाचण्या करायला सांगितल्या. त्यामध्ये राजेंद्र यांचे प्लेटलेट्स 36000 एवढे झालेले आढळले. त्यांचा ब्लडप्रेशरही खूप कमी झाला होता. तरीही केवळ गोळ्या, औषधे देऊन येथील डॉक्टरांनी राजेंद्र यांना घरी जाण्यास सांगितले. मात्र घरी गेलेल्या राजेंद्र यांना अत्यवस्थ वाटू लागले. कुटुंबियांनी त्यांना पुन्हा एकदा कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तपासणीअंती राजेंद्र यांचा मृत्यू झाला होता, असे स्पष्ट झाले.
घटनेची माहिती समजतात वागदे गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. वागदे सरपंच संदीप सावंत, माजी उपसरपंच रुपेश आमडोसकर आदींनी उपजिल्हा रुग्णालय गाठले. राजेंद्र ऍडमिट करून न घेणारे ते डॉक्टर कोण होते, असा सवाल ग्रामस्थांनी केला. जोपर्यंत जिल्हा शल्य चिकित्सक येथे येत नाहीत, राजेंद्र यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या त्या डॉक्टरवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. घटनेचे गांधर्व पाहून कणकवली पोलीसही उपजिल रुग्णालयात दाखल झाले आहेत.










