
कणकवली : श्रीनिवास रेड्डी (५३, रा. बेंगलोर) यांच्या खूनप्रकरणी अटक करण्यात आलेला पाचवा आरोपी वर्धन के. एन. (२०, रा. चिंकबल्लापूर - कर्नाटक) याला गुरुवारी दुपारनंतर येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तर यापूर्वीच अटक व पोलीस कोठडीत रवानगी झालेल्या चारही संशयितांना पोलीस कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.
दरम्यान पोलीसी तपासामध्ये अनेक मुद्दे समोर आले आहेत. यामध्ये मयत श्रीनिवास रेड्डी यांचा खून साळीस्ते येथेच व कारमध्येच झाल्याचे उघड होत आहे. मयत रेड्डी व अन्य तीन संशयित हे एकाच कारने बेंगलोर येथून सर्वप्रथम गोवा येथे व तेथून साळीस्ते तेथे आले. या तिघांमध्ये मधुसूदन तोकला, मनू पी. बी. व आता अटक केलेला वर्धन अशा तिघांचा समावेश होता. यातील मनु व वर्धन यांनी चाकूच्या सहाय्याने श्रीनिवास यांचा खून केल्याचे तपासात उघड झाले आहे. खुनामधील एक चाकू पोलिसांनी जप्त केला आहे.
दरम्यान मयत श्रीनिवास व आरोपी मधुसूदन यांच्यावर बेंगलोर येथेच एक खंडणीचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यांमध्ये अटक होण्याच्या भीतीने श्रीनिवास व मधुसूदन हे बेंगलोर येथून प्रसार झाले होते, अशी ही माहिती तपासात पुढे येत आहे. सदरच्या खूनाला 'प्रॉपर्टी'चेच कारण आहे. मयत श्रीनिवास आणि आरोपी मधुसूदन व अन्य एक यांच्यामध्ये प्रॉपर्टी वरून वाद आहेत. याच वादातून हा खून झाला असून प्रॉपर्टी वादाशी संबंधित असलेल्या अन्य एका आरोपीचा शोध सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.










