
कणकवली : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आयोजित दिव्यांग तपासणी शिबिराला परिसरातील दिव्यांग बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. युनिक डिसॅबिलिटी आयडेंटिटी कार्ड (युडीआयडी कार्ड) काढण्यासाठी सोय उपलब्ध व्हावी, या मागणीनुसार हे शिबिर घेण्यात आले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी, युडीआयडी कार्ड काढताना कोणतीही अडचण आल्यास महसूल अधिकारी, कर्मचारी यांचे सर्वतोपरी सहकार्य मिळेल, असे आश्वासन तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिले.
शिबिराचे उद्घाटन तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी, एकता दिव्यांग विकास संस्थेचे अध्यक्ष सुनील सावंत, सचिव सचिन सादये, सभासद अशोक पाडावे, संगीता पाटील, यल्लाप्पा कट्टीमनी, नेत्रतज्ज्ञ डॉ. बाळासाहेब जोशी, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. धनंजय रासम, आणि डॉ. डोंगरे आदी उपस्थित होते.
ओरोस येथे जाऊन युडीआयडी कार्ड काढावे लागत असल्याने कणकवली तालुक्यातील दिव्यांग बांधवांची गैरसोय होत होती. ही गैरसोय दूर करण्यासाठी कणकवली तालुक्यातच शिबिर आयोजित करण्याची मागणी एकता दिव्यांग विकास संस्थेच्यावतीने करण्यात आली होती. त्यानुसार हे विशेष तपासणी शिबिर घेण्यात आले.
कणकवलीतील शिबिर यशस्वी होण्यासाठी शासकीय यंत्रणांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल तहसीलदार देशपांडे यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच युडीआयडी कार्ड मिळाल्यानंतर संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेसाठी प्रस्ताव तहसील कार्यालयात सादर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
दिव्यांग बांधवांना तालुकास्तरावरच युडीआयडी कार्ड सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल संगीता पाटील यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा प्रशासनाचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मानसी नकाशे यांनी केले.
या शिबिरामुळे अनेक दिव्यांग बांधवांना आवश्यक वैद्यकीय तपासण्या आणि युडीआयडी कार्ड काढण्याची प्रक्रिया एकाच ठिकाणी पूर्ण करता आली, त्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, शिबिरांतर्गत दिव्यांग बांधवांची आरोग्य तपासणी करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागातील डॉक्टर व कर्मचारी उपजिल्हा रुग्णालयात उपस्थित होते. या शिबिराचा ४२८ दिव्यांग बांधवांनी लाभ घेतला. शिबिरादरम्यान उपजिल्हा रुग्णालयानजीकच्या सिद्धीविनायक मित्रमंडळातर्फे उपस्थित दिव्यांग बांधव, त्यांचे नातेवाईक व अधिकारी, कर्मचाऱ्यांना मोफत सरबत वाटप करण्यात आले.










