
कणकवली : येत्या काही महिन्यांमध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदा, नगरपंचायतीच्या निवडणुकीत दुबार मतदान होऊ नये याकरता राज्य निवडणूक आयोगाकडून एक महत्त्वपूर्ण आदेश काढण्यात आला असून, त्या आदेशानुसार "दुबार" मतदान करणाऱ्या मतदारांना मात्र आता चाप बसणार आहे. या आदेशानुसार निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या लॉगिन आयडी व पासवर्ड चा वापर करून त्या संकेतस्थळावर प्रवेश केल्यानंतर रिपोर्ट या मुख्य टॅब खाली 'दुबार रिपोर्ट' असा 'सबमेन्यू' देण्यात आलेला आहे. या सबमेन्यूवर क्लिक केल्यानंतर स्थानिक स्वराज्यसंस्थेच्या मतदार यादी मध्ये किती मतदारांची नावे एका पेक्षा अधिक वेळा आली आहेत त्याची यादी देखील तपशीलासहित देण्यात आली आहे. या दुबार किंवा तीबार नावे असणाऱ्या नावांच्या समोर एक सांकेतिक चिन्ह देण्यात आले असून, त्यानुसार यादीतील संभाव्य दुबार नावांबाबत स्थानिक तपासणी करून ते नाव खरोखरच एकाच तिची आहेत की वेगवेगळ्या व्यक्तींची याबाबत खात्री करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्या आहेत. त्यासाठी मतदाराचे नाव, लिंग, पत्ता व छायाचित्र याची प्राथमिक तपासणी करून त्यामध्ये जर साम्य आढळले तर संबंधित मतदारांशी संपर्क साधून त्यांच्याकडून माहिती मिळवावी असे आदेश देण्यात आले आहेत.
एकापेक्षा जास्त नावे असलेला मतदार ही एकच व्यक्ती आहे याबाबतची खात्री झाल्यास तो नेमका कोणत्या प्रभागातील, जिल्हा परिषद विभागातील, पंचायत समिती गणात मतदान करणार आहे याबाबतचा अर्ज विहित नमुन्यात घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर प्राधिकृत अधिकाऱ्याची खात्री पटल्यावर संबंधित मतदारास त्याच्या इच्छेनुसार प्रभाग, जिल्हा परिषद विभाग, पंचायत समिती गणातील मतदान केंद्र निश्चित करता येणार आहे. सदर मतदाराने निवडलेल्या मतदान केंद्रातच त्याला मतदान करण्याचा अधिकार असणार आहे. अशा मतदाराचे इतर प्रभाग, जिल्हा परिषद विभाग, पंचायत समिती गणामध्ये नाव असल्यास त्या नावासमोर "दुबार मतदार" ज्या मतदान केंद्रावर मतदान करणार त्या विभाग, गण किंवा प्रभागाचे नाव व मतदार ज्या ठिकाणी मतदान करणार आहे त्या ठिकाणचा त्याचा क्रमांक व मतदाराचा अनुक्रमांक नमूद करण्यात येणार आहे. अशी नोंद झालेल्या मतदारास अन्य कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही. असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. एकापेक्षा जास्त ठिकाणी नाव असलेल्या मतदाराकडून या प्रक्रियेला प्रतिसाद मिळाल्यास स्थानिक स्वराज्यसंस्थेच्या मतदार यादी मध्ये "दुबार मतदार" अशी नोंद करत असा मतदार मतदान केंद्रावर मतदान करण्यास आल्यास त्या मतदाराने इतर कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केले नसल्याबाबत विहित नमुन्यातील हमीपत्र लिहून घेण्यात येणार आहे. अशा मतदाराची काटेकोरपणे ओळख पटवून घेत त्याला मतदान करण्याची एकाच ठिकाणी संधी देण्यात येणार आहे. मतदान केंद्राध्यक्षांनी या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी, नगरपरिषदा, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्या सह संबंधितांना आयोगाने या सूचना दिल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
   
                    
   


 
      
   
   
  
 
  
  
  
  
  	
   
   



               



