
कणकवली : वस्त्रहरण नाटकाच्या माध्यमातून गंगाराम गवाणकर यांनी मालवणी भाषा सातासमुद्रापार नेली. या नाटकाचे आजपर्यंत ५००० हजारांहून अधिक प्रयोग झाले आहेत. गवाणकर यांच्या वस्त्रहरण नाटकामुळे जगभरात मालवणी भाषेचा बोलबाला आहे, हा बोलबाला टिकवून ठेवणे हीच खरी वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांना श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दांत मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कणकवली शाखा व गोपुरी आश्रमाच्यावतीने वस्त्रहरणकार गंगाराम गवणाकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गोपुरी आश्रमाच्या कार्यालयात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोमसपच्या कणकवली शाखेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार माधव कदम, ज्येष्ठ पत्रकार विजय शेट्टी, कार्यवाह नीलेश ठाकूर, राजेश रेगे, रिमा भोसले, राजन भोसले, संदीप सावंत, सिद्धेश खटावकर, उमेश जाधव, सदाशीव राणे आदी उपस्थित होते.
विजय शेट्टी म्हणाले, वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांच्या जाण्याने साहित्य, नाट्य क्षेत्राची मोठी हानी झाली. ही हानी कद्यापही भरून न येणारी आहे. मच्छिंद्र कांबळी व गंगाराम गवाणकर यांनी वस्त्रहरण नाटकाच्या माध्यमातून मालवणी भाषा सातासमुद्रापार नेली. गंगाराम गवाणकर यांचे वस्त्रहरण नाटक एकदा पाहून समाधान होत नाही, तर ते पुन्हा पुन्हा पाहण्याची इच्छा होते. गंगाराम गवणाकर यांचे आयुष्य खूप खडतर होते. त्यातूनही त्यांनी साहित्य व नाट्य क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.
माधव कदम म्हणाले, वस्त्रहरण नाटकाद्वारे गंगाराम गवाणकर व मच्छींद्र कांबळी यांनी मालवणी भाषेचा जगभर प्रचार व प्रसार करून या भाषेविषयी प्रत्येकाचा मनात आवड निर्माण करण्याचे काम केले. साहित्य व नाट्य क्षेत्रात गंगाराम गवाणकर यांचे मोलाचे योगदान आहे. साहित्य व नाट्य क्षेत्रात त्यांनी उत्तुंग उंची गाठली तरी त्यांचा स्वभाव निरागस, खोडकर, मनाचा मोठेपणा दाखवणारा होता. आयुष्यात त्यांनी संघर्ष केला. ते आपले आयुष्य साधेपणाने जगले. त्यांचा साधेपणा सर्वांना भावत होता. नाना यांच्या जाण्याने साहित्य, नाट्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. मालवणी माणसांनी मालवणाची भाषेचा जगभर प्रचार व प्रसार करून मालवणी भाषेचा झेंडा फडकवत ठेवावा.
नाना यांच्या जाण्याने मालवणी मुलखाचे मोठे नुकसान झाले आहे. नानांनी आपल्या लेखणीतून साहित्य व नाटक क्षेत्रात स्वत:चे नाव अजारामर केले आहे, असे राजस रेगे यांनी सांगितले. रिमा भोसले यांनी नानांच्या आठवणींना उजाळा दिला. सिद्धेश खटावकर यांनी नानांसोबत काम करताना आलेले अनुभव शेअर केले. त्यांच्या साहित्यात तरुणपणा होता. त्यामुळे त्यांचे साहित्य वाचल्यानंतर तरुण पिढीला नवी उमेद मिळते, अशी भावना खटावकर यांनी व्यक्त केली. आरंभी मान्यवरांनी गंगाराम गावणकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सिद्धेश खटावकर यांनी केले.











