भाजप विचारांच्या सरपंचांना नितेश राणेंनी दिलेल्या निधीचा लेखाजोखा मांडावा

माजी आमदार वैभव नाईक यांचं आव्हान
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: October 27, 2025 18:15 PM
views 93  views

कणकवली : निवडणूक आली कि पालकमंत्री नितेश राणे मेळावे घेऊन भाजपच्या विचारांचे लोकप्रतिनिधी निवडून दिले तरच विकासनिधी देणार अशा धमक्या जनतेला देतात. ग्रामपंचायत निवडणुकीवेळी देखील भाजपचे सरपंच निवडून दिल्यास भरघोस निधी देऊ, असे नितेश राणे यांनी सांगितले होते. मात्र, मागील अडीच वर्षात अशा ग्रामपंचायतींना आणि सरपंचांना किती रुपये निधी दिला याचा लेखाजोखा नितेश राणेंनी मांडावा. जिल्हा नियोजनचा निधी हा प्रत्येक जिल्ह्याला मिळत असतो, तो हक्काचा निधी असतो, दरवर्षी त्यात वाढ होते. मात्र, जिल्हा नियोजन निधी व्यतिरिक्त किती निधी पालकमंत्र्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणला, हे जाहीर करावे, असे आव्हान कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी दिले आहे. 

केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असूनही विविध योजनांमधून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अधिकचा निधी खेचून आणण्यात पालकमंत्री अपयशी ठरत आहेत. त्यामुळे रस्ते, वीज, पाणी,कृषी, शिक्षण,पर्यटन क्षेत्राचा विकास खुंटला आहे अशी टीका वैभव नाईक यांनी केली आहे. 

भाजपच्या विचारांचे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य निवडून दिलात तर भरभरून निधी दिला जाईल, अन्यथा विकासाचे दरवाजे बंद होतील, अशी धमकी पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यातील जनतेला दिली आहे. त्यावर वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया देताना नितेश राणेंवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, निधी वाटपाच्या धमकीवरून  नितेश राणेंनी आपली राजकीय सूडभावना दाखवून दिली आहे. मंत्रीपद स्वीकारताना घेतलेल्या शपथेचा त्यांना विसर पडला आहे.

महायुतीतील घटक पक्षांना देखील नितेश राणेंनी घरचा आहेर दिला आहे. खरतर  नितेश राणे आपल्या खिशातून किंवा भाजप पक्षाच्या पार्टी फंडातून जिल्ह्यातील विकास कामांना निधी देत नाही तर जनतेने भरलेल्या करातून विकास कामासाठी सरकार कडून निधी दिला जातो. त्यामुळे नितेश राणेंनी जनतेकडून मिळणाऱ्या पैशावर आपला हक्क दाखवू नये. जिल्हा नियोजनच्या निधीत किंवा सरकारच्या आलेल्या कुठल्याही निधीत पक्षपातीपणा होता नये. प्रत्येक जिल्हावासीयांना या निधीचा उपयोग झाला पाहिजे. शिवसेना पक्ष सत्तेत असताना हे तत्व पाळण्यात आले होते आणि जर तरीही जनतेचा कराचा हा पैसा केवळ भाजपच्या लोकप्रतिनिधींनाच द्यायचा असेल तर सर्व गोष्टींवरील कर देखील भाजपच्या लोकांकडूनच घेतला गेला पाहिजे, अशी खोचक टीका वैभव नाईक यांनी केली आहे.