इतिहास संशोधकांनी शोधनिबंध सादर करावेत

अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे आवाहन
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: October 26, 2025 14:46 PM
views 14  views

कणकवली : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात १६ व १७ जानेवारी २०२६ रोजी अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे ३३ वे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्त आंतर विद्याशाखीय परिषदेत होणार मराठा किल्ल्यांचे संशोधन होणार आहे.  इतिहासप्रेमी प्राध्यापक, अभ्यासक व संशोधकांनी जागतिक वारसा संरक्षण स्थळे यादीतील मराठा साम्राज्याच्या किल्ल्यांवरील आपले अभ्यासपूर्ण शोधनिबंध सादर करावेत, असे आवाहन अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदतर्फे करण्यात आले आहे. 

इतिहास परिषदेच्यानिमित्ताने अखिल भारतीय पातळीवरील अभ्यासकांचे आंतरविद्याशाखीय शोधनिबंध अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेच्या राष्ट्रीय पातळीवरील मान्यता प्राप्त, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या यादीतील, तज्ज्ञ परिक्षित मासिकात चार खंडात प्रकाशित करण्यात येणार आहेत. अलीकडेच युनोस्कोने जागतिक वारसा स्थळ संरक्षण यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे साक्षीदार असलेल्या एकूण बारा किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे. 'महाराष्ट्रातील मराठा सम्राज्याचे किल्ले' या गटात जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेल्या या किल्ल्यांचा इतिहास पुन्हा एकदा संशोधनाच्या निमित्ताने पुनर्जीवित होणार आहे. जागतिक पातळीवर लौकिकास पात्र ठरलेल्या व ऐतिहासिक वारसा म्हणून नोंदल्या गेलेल्या भारतातील प्रमुख मराठा  किल्ल्यांमध्ये साल्हेर, शिवरायांची जन्मभूमी असलेला किल्ले शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा,  तामिळनाडूतील जिंजी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग व विजयदुर्ग या किल्ल्यांचा समावेश आहे.


कोकण ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेला प्रदेश असून दक्षिण कोकणात प्रथमच होत असलेल्या या अखिल भारतीय स्वरूपाच्या राष्ट्रीय परिषदेमध्ये मराठा साम्राज्यातील  १२ प्रमुख किल्ले व अन्य महत्वाच्या किल्ल्यांची भौगोलिक रचना, ऐतिहासिक घडामोडी, शिल्प कला, मूर्ती कला, संरक्षण व्यवस्था, वास्तुकला,किल्ल्यांचे राजकीय महत्त्व, किल्ला आणि परिसराची आकर्षक  छायाचित्रे, वास्तुकला, यांचे डिजिटल स्वरूपात सादरीकरण करण्यासाठी एक स्वतंत्र सत्र महाविद्यालयातील एचपीसील हॉलमध्ये ठेवण्यात आले आहे. तरी इतिहासप्रेमी प्राध्यापक, अभ्यासक व संशोधकांनी जागतिक वारसा संरक्षण स्थळे यादीतील मराठा साम्राज्याच्या किल्ल्यावरील  आपले अभ्यासपूर्ण शोधनिबंध डॉ . मारोती चव्हाण (इतिहास विभाग, कणकवली कॉलेज) यांच्याकडे पाठवावेत, असे आवाहन कणकवली महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य युवराज महालिंगे, इतिहास विभागप्रमुख डॉ. सोमनाथ कदम, सामाजिक विज्ञान मंडळाचे सचिव डॉ. राजेंद्र मुंबरकर, अंतर्गत गुणवत्ता व हमी कक्षाचे समन्वयक डॉ. शामराव दिसले, भूगोल विभाग प्रमुख डॉ. बी. एल.राठोड यांनी केले आहे.