
कणकवली : तालुक्यातील तळेरे बसस्थानकातून एका महिलेचे मंगळसूत्र लंपास झाले आहे. शनिवारी सकाळी १०.१० वा. सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी नयन नंदकुमार माणगांवकर (वय ५३) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
नयन माणगावकर ह्या मुंबईला वास्तव्याला असतात. दिवाळीनिमित्त त्या आपल्या मूळ गावी फोंडाघाट - नवीन कुर्ली वसाहत येथे आल्या होत्या. त्या शनिवारी कणकवली - विजयदुर्ग या बसमधून तळेरे येथून फणसगाव येथे आपल्या भावाकडे निघाल्या होत्या. तळेरे बसस्थानकातून त्या एस.टी.बस मध्ये चढत असताना त्यांच्या पर्समधील एका कप्प्यातील ४८ ग्रॅम वजनाचे आणि २ लाख २० हजार रूपये किंमतीचे मंगळसूत्र एका २८ ते ३० वयोगटाच्या महिलेने लंपास केले. बसमध्ये चढल्यानंतर पर्स उघडी असल्याचे आणि आतील मंगळसूत्र लंपास झाल्याची बाब नयन यांच्या लक्षात आली. त्यांनी याबाबतची खबर कणकवली पोलिस ठाण्यात दिली. मंगळसूत्र चोरी प्रकरणाचा तपास कणकवली पोलीस करत आहेत.










