'त्या' खून झालेल्या इसमाची ओळख पटली..?

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: October 24, 2025 19:40 PM
views 1113  views

कणकवली : तालुक्यातील साळीस्ते येथे महामार्गानजीक गणपती सान्याच्या पायरीवर खुनी अवस्थेत सापडलेल्या त्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम कणकवली पोलीस व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा यांच्याकडून शुक्रवारी दिवसभर सुरू होते. दिवसभराच्या तपासांती हा मृतदेह श्रीनिवास रेड्डी (५३, रा बेंगलोर - कर्नाटक यांचा असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले. मात्र, याविषयी तपास सुरू असल्याचे कारण सांगत अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला.

ही घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली होती. खून झालेल्या इसमाचे डोके, छातीचा भाग काहीसा कुजला होता. शरीरावर ठिकठिकाणी धारदार शस्त्राचे वार होते. मयत तरुणाची ओळख पटू नये, यासाठी मारेकर्‍यांनी मृतदेहाचा चेहरा विद्रुप करण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगवान फिरवली. यामध्ये हा मृतदेह बेंगलोर येथील असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी गुप्त माहितीगाराद्वारे बेंगलोर येथील दोन व्यक्तींशी संपर्क साधला. या दोन्ही व्यक्ती गुरुवारी दुपारच्या सुमारास कणकवलीत दाखल झाल्या. पाहणीअंती हा मृतदेह श्रीनिवास रेड्डी यांचा असल्याचे त्या दोन्ही व्यक्तींनी मान्य केले. 

मात्र, या दोन्ही व्यक्ती मयताच्या नातेवाईक नाहीत. या दोन व्यक्ती नेमक्या कोण आहेत याविषयीही माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. सद्यस्थितीत जे नाव समजले आहे त्या 'श्रीनिवास रेड्डी' यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी पोलिसांचे एक पथक बेंगलोरला रवाना झाले आहे. हे पथक श्रीनिवास रेड्डी यांच्या कुटुंबीयांना घेऊन कणकवलीत परतणार आहे. त्यानंतरच हा मृतदेह श्रीनिवास रेड्डी यांचा आहे की नाही, हे अधिकृतरित्या स्पष्ट होईल, असे कणकवलीचे पोलीस निरीक्षक तेजस नलावडे यांनी सांगितले.

खून झालेल्या व्यक्तीचे नाव 'श्रीनिवास रेड्डी' आहे की नाही, याचे 'कन्फर्मेशन' कणकवली पोलिसांकडे अद्यापही नाही. येत्या एक ते दोन दिवसांमध्ये खून झालेल्या व्यक्तीचे नाव निश्चित होईल, असे कणकवली पोलीस सांगत आहेत. मात्र, नाव निश्चित झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या खुन्याला शोधण्याचे आव्हान कणकवली पोलिसांसमोर आहे. दरम्यान दोडामार्ग येथे रक्त लागलेली कार सापडली होती, त्याचा आणि या खुनाचा परस्परांशी संबंध आहे की नाही, याविषयीही बोलण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.