
कणकवली : तालुक्यातील साळीस्ते येथे गुरुवारी दुपारी खूनी अवस्थेत सापडलेल्या त्या तरुणाची आज, शुक्रवारी ओळख पटण्याची शक्यता आहे. कणकवली पोलीस हे पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली गतिमान तपास करत, महत्वपूर्ण पुरावे गोळा करत मयत तरुणाच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचले. खून झालेला तरुण हा महाराष्ट्रानजीकच्याच एका राज्यातील असून त्याचे कुटुंबिय कणकवलीला येण्यास निघाले आहेत. त्यामुळे आज, शुक्रवारी सायंकाळपर्यंत तरुणाची ओळख पटेल व त्याच्या खूनाचे गुढ उलगडेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
ही घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली होती. खून झालेल्या युवकाचे डोके, छातीचा भाग काहीसा कुजला होता. शरीरावर ठिकठिकाणी धारदार शस्त्राचे वार होते. मयत तरुणाची ओळख पटू नये, यासाठी मारेकर्यांनी मृतदेहाचा चेहरा विद्रुप करण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र पोलिसांनी तपासाची चक्रे वेगवान फिरवली. यामध्ये हा मृतदेह महाराष्ट्रानजीक असलेल्या एका राज्यामधील तरुणाचा असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले. पोलिसांनी तरुणाच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. त्यानुसार तरुणाचे कुटुंबीय आता कणकवलीत येत आहेत. तरुणाची ओळख निश्चित झाल्यानंतर पोलिसांचा पुढील तपासही वेगवान होणार आहे त्यामुळे हा खून कोणी केला व त्याची कारणे काय या बाबीही लवकरच स्पष्ट होणार असल्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.










