
कणकवली : कविता म्हणजे भावनांचा दरवळ, अनुभूतीचा सुगंध, आणि विचारांची लय. त्या लयीचा अर्थ समजला की, तिची उमज आपोआप उमलते. अशा समजलेल्या आणि उमजलेल्या कविता म्हणजेच कल्पना मलये यांचा ‘समज – उमज’ हा नवा काव्यसंग्रह! कोकणातील उदयोन्मुख कवयित्री, कथालेखिका आणि बालसाहित्यिक म्हणून ओळख असलेल्या कल्पना मलये यांच्या या काव्यसंग्रहाचा भव्य प्रकाशन सोहळा कणकवली कॉलेजच्या एच. पी. सी. एल. सभागृहात, प्रसिद्ध नाटककार, लेखक व संवाद–पटकथा लेखक किरण येले यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा जेष्ठ कादंबरीकार व कवयित्री उषा परब यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात लेखक, कवी किरण येले, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, विदर्भातील विशाखा काव्य पुरस्कार प्राप्त कवी मोहन शिरसाट, कवयित्री, लेखिका रश्मी कशेळकर, लेखिका डॉ. अनुजा जोशी आदी मान्यवरांनी कल्पना मलये यांच्या काव्यप्रवासावर आपल्या मनोगतातून प्रकाश टाकला.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी अस्मि जोईल आणि रुपाली कदम यांनी कल्पना मलये यांच्या 'समज उमज' या काव्यसंग्रहातील कवितांचे वाचन करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा उषा परब, प्रमुख अतिथी किरण येले, जयप्रकाश परब, मोहन शिरसाट, रश्मी कशेळकर, डॉ. अनुजा जोशी आदी मान्यवरांना ग्रंथ भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी कवयित्री कल्पना मलये यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. यात त्यांनी आपल्या लेखन प्रवासाविषयी माहिती दिली. 'कारटो', 'सई', 'लिओ' या बालसाहित्यानंतर त्यांचा 'समज उमज' हा कविता संग्रह प्रकाशित झाला आहे. या कवितासंग्रहातून स्त्रीच्या मनाचा ठाव घेणाऱ्या कविता आणि स्त्रीचं परिघाबाहेरचं जगणं त्यांनी मांडलं आहे. यावेळी कवयित्रीने आपल्या लेखनाच्या जडणघडणीविषयी मनोगत व्यक्त करत त्यांना साहित्य क्षेत्रात समृद्ध करणाऱ्या आपल्या आदर्शांचे आभार मानले.
कविता आपण का लिहावी याची समज आली की ती कशी लिहावी याची उमज आपोआप येत जाते. कवितेसाठी थांबायची तयारी असेल त्यालाच कविता भेटते. कल्पना मलये यांच्या कविता या त्यांना उमजलेल्या ओळी आहेत. त्या स्त्री मनाला भेडसावणाऱ्या प्रश्नांना निर्भीडपणे भिडतात. या कविता समाजमनाला आत्मविश्वास देतात. त्यांच्या कविता या टोकदार आहेतच आता त्या जनमान्य झाल्या आहेत. कोकणातील महत्त्वाच्या साहित्यिकांमध्ये आता कल्पना मलये हे नाव ठळकपणे आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. 'समज उमज' दीर्घ काळाच्या प्रतिक्षेतून आलेले तत्त्वचिंतन आहे, अशा शब्दांत सुप्रसिद्ध नाटककार, लेखक, कवी, संवाद-पटकथा लेखक किरण येले यांनी कल्पना मलये यांच्या काव्यप्रवासाला शुभेच्छा दिल्या.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांनी, कोकण भूमीतल्या अनेक साहित्यिकांनी मराठी साहित्याला समृद्ध केलंय. त्यात स्त्री साहित्यिकांमध्ये कल्पना मलये यांचे नाव आता जोडले गेले असून स्त्रीत्वाची कथा, व्यथा त्यांच्या साहित्यामधून दिसून येतात, अशा भावना व्यक्त करत त्यांच्या काव्य प्रवासाला शुभेच्छा दिल्या. रश्मी कशेळकर यांनी कल्पना मलये यांच्या कवितेच्या वेगळेपणावर आपले विचार मांडले. कल्पना मलये यांची कविता ही स्वतःच्या अटींवर जगणारी कविता आहे. त्यांची कविता स्त्रीत्वाविषयी उणेपणा न बाळगता आपला सृजनसोहळा मांडते, असे म्हणत त्यांच्या काव्यप्रतिभेला शुभेच्छा दिल्या. विशाखा काव्य पुरस्कार प्राप्त कवी मोहन शिरसाट यांनी कल्पना मलये यांना उमजलेल्या कवितेवर भाष्य केले. जग हे अनेक द्वयींनी बनलेले असून समज आणि उमज या अशाच दोन बाबी आहेत. कविता समजली की ती उमजू लागते. कल्पना मलये यांची कविता ही त्यांना उमजलेली कविता आहे, असे म्हणत कविता ही ऊर्जा देते. जगणं समृद्ध करते. जे चांगलं वागतात त्यात कविता असते. वाईटात कविता नसते. कल्पना मलये यांची कविता ही समाजात चांगलं पेरणारी कविता आहे, अशा शब्दांत कवयित्रीच्या कवितेचा गौरव केला. डॉ. अनुजा जोशी यांनी आपल्या भावना मांडताना, वाचक म्हणून समृद्ध करणारे हे पुस्तक असून यात कल्पना मलये यांनी त्यांना आलेले अनुभव, अनुभूती मांडलेली आहे. हा कविता संग्रह शाळकरी मुली, संसारी स्त्रिया यांसाठी वेगवेगळा आणि महत्त्वाचा जीवनानुभव देणारा आहे. स्त्री-पुरुष नातेसंबंधातील गोडवा शोधणारी ही कविता आहे, अशा शब्दांत काव्यसंग्रहाचे महत्त्व विशद केले. अध्यक्षीय स्थानावरून बोलताना जेष्ठ लेखिका उषा परब यांनी 'समज उमज' मध्ये संत कवयित्रींच्या काव्यातील संयत विद्रोह दिसून येतो, अशा शब्दांत या काव्यसंग्रहाचे कौतुक केले. सिंधुदुर्गच्या साहित्यविश्वातील स्त्री साहित्यिकांचे स्थान यावर मत व्यक्त केले. त्या मांदियाळीत आता कल्पना मलये यांचा समावेश झाला आहे. पहिल्या मालवणी कादंबरीकार म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. सोबतच बालसाहित्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. आता आपल्या स्त्रीत्वाचा जागर त्यांनी 'समज उमज' या काव्यसंग्रहातून मांडला असून तो साऱ्या स्त्रीमनाला प्रेरणा देणारा आणि पुरुषमनाला विचार करण्यास प्रवृत्त करणारा आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
'समज उमज' हा काव्यसंग्रह बुलढाणा येथील वर्णमुद्रा पब्लिशर्स यांनी प्रकाशित केला असून दिनकर मनवर यांनी मुखपृष्ठ सजवले आहे. वृषाली किन्हाळकर यांनी या कवितासंग्रहाला प्रस्तावना दिली असून पुस्तकाची मांडणी व टाईपसेटिंग भाग्यश्री बनहट्टी यांनी केली आहे.
या प्रकाशन सोहळ्याला जेष्ठ लेखिका, कवयित्री संध्या तांबे, गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, चित्रकार नामानंद मोडक, जेष्ठ नाटककार सुहास वरुणकर, अभिनेते-निवेदक निलेश पवार, सामाजिक कार्यकर्ते बाळू मेस्त्री, कवी मोहन कुंभार, बौद्ध साहित्य आणि पाली भाषा अभ्यासक गोपी पवार, शिक्षिका प्रतिभा कोतवाल, सिंधुदुर्गनगरी आकाशवाणीच्या नेत्रा दळवी, इंजिनिअर अनिल जाधव, सायली गुरव, रिमा भोसले, नेहा मोरे, विजय चौकेकर, नीलम सावंत-पालव, सुरेश पवार, विनायक जाधव, संदीप सावंत, गिल्बर्ट फर्नांडिस, प्रा. जगदीश राणे, स्नेहलता राणे, माध्यमिक शिक्षक पतपेढी संचालक विद्या शिरसाट, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, कल्पना मलये यांचे कुटुंबीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या नियोजनात समृद्धी जैतापकर यांनी मोलाचा वाटा उचलला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले तर आभार मोहन कुंभार यांनी मानले.










