संदेश पारकरच असणार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार

उबाठा शिवसेना कार्यकर्त्यांचा विश्वास | बैठकीत आग्रही मागणी
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: October 11, 2025 18:58 PM
views 1442  views

कणकवली : नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदांची आरक्षणे जाहीर झाली असून कोणत्याही क्षणी निवडणुकांच्या तारखाही घोषित होतील. याच पार्श्वभूमीवर उबाठा शिवसेना कार्यकर्ते व कणकवलीतील काही नागरिकांची एकत्रित बैठक उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कणकवलीचे माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या निवासस्थानी पार पडली. आगामी कणकवली नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी संदेश पारकर यांनी लढावे, अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी बैठकीत केली. संदेश पारकर हमखास विजयी होतील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. तर पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील तो निर्णय आपल्याला मान्य असल्याचे पारकर यांनी सांगितले. 

युवा जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या उपस्थितीत  पार पडलेल्या या बैठकीस माजी नगरसेवक रुपेश नार्वेकर, उमेश वाळके, कन्हैया पारकर, प्रसाद अंधारी, दादा परब, सामाजिक कार्यकर्ते सुदीप कांबळे, नीलम पालव, अनिल डिगवेकर आदी उपस्थित होते. 

संदेशभाई तुम्ही निवडणूक लढवाच. तुम्हाला जिंकवून आणण्याची जबाबदारी आम्ही कार्यकर्ते स्विकारतो, अशी ग्वाही कार्यकर्त्यांनी दिली. तर पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे व वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे, असे संदेश पारकर म्हणाले. त्यामुळे आगामी कणकवली नगरपंचायत निवडणूकीत उबाठा शिवसेनेचे फायर ब्रँड नेते संदेश पारकर हेच नगराध्यक्ष  पदाचे उमेदवार असतील, असा विश्वासही कार्यकर्ते यावेळी व्यक्त करत होते.