
कणकवली : एस.एस.पी.एम. कणकवली (कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग), येथील इनक्युबेशन प्रमुख म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ. कल्पेश सुनिल कांबळे यांची देशातील उच्चतम अभियांत्रिकी संस्था, इंडियन नॅशनल अकादमी ऑफ इंजिनीअरिंग (INAE) मध्ये वरिष्ठ सदस्य म्हणून निवड झाली आहे. भारत सरकारच्या ठरारावाद्वारे स्थापन झालेली आणि भारतीय विज्ञान संस्था (IISc), भारतीय तंत्रज्ञान संस्था (IITs) व इंडियन नॅशनल सायन्स अकादमी (INSA) यासारख्या प्रतिष्ठित संस्थांनी स्थापन केलेली INAE ही देशातील एकमेव शिखर अभियांत्रिकी अकादमी आहे. देशातील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाचा पाया व समृद्धी साधणे हे याचे प्रमुख उद्दिष्ट आहे आणि देशातील सर्वात विशिष्ट अभियंते, तंत्रज्ञ आणि वैज्ञानिक यांचे सदस्यत्व आहे.
अकादमीतर्फे पहिल्या चक्रासाठी देशभरातून केवळ ३१ जणांची या वरिष्ठ सदस्यत्वासाठी निवड करण्यात आली आहे. या निवडीतून डॉ. कल्पेश कांबळे हे संपूर्ण कोकण प्रदेशातून एकमेव निवडलेले सदस्य आहेत, या वस्तुस्थितीने हा बहुमान त्यांच्यासाठी अधिकच अर्थपूर्ण झाला आहे. कोकण प्रदेशातून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
"अभ्यास आणि संशोधन क्षेत्रातील कार्याला मिळालेला हा एक उत्कृष्ट सन्मान आहे. माझ्या शैक्षणिक वाटचालीत सहभागी झालेल्या सर्व मार्गदर्शक, सहकारी आणि विद्यार्थ्यांना मी या यशाचे श्रेय देतो." असा आनंद डॉ. कल्पेश कांबळे यांनी व्यक्त केला आहे. या संधीबद्दल त्यांनी कणकवली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चे व्यवस्थापक, मार्गदर्शक, सहकारी आणि महाविद्यालयीन कुटुंबाचे मन:पूर्वक आभार मानले आहेत.
महाविद्यालयाच्या प्राचार्य आणि प्राध्यापकांनी त्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, "डॉ. कांबळे यांची ही निवड इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल." संस्थेसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याची भावना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी . एस. बाडकर यांनी व्यक्त केली आहे. तसेच त्यांच्या उल्लेखनीय यशांना एस. एस. पी. एम. संस्थेचे संस्थापक मा. नारायणरावजी राणे, अध्यक्षा सौ. निलमताई राणे, उपाध्यक्ष श्री. निलेशजी राणे आणि सचिव श्री. नितेशजी राणे यांनी भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.










