व्यसनमुक्त गडकिल्ले संवर्धन मोहिमेचा सिंधुदुर्गातून शुभारंभ

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ११ ऑक्टोबरला यशवंतगडावर उद्घाटन
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: October 10, 2025 19:42 PM
views 120  views

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक गड-किल्ल्यांना व्यसनमुक्त करण्यासाठी तसेच वारसा संवर्धनाचा संदेश देण्यासाठी ‘व्यसनमुक्त गडकिल्ले संवर्धन' मोहीमेचा शुभारंभ सिंधुदुर्गातून होणार आहे. या मोहिमेचे उद्घाटन पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते ११ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता वेंगुर्ले तालुक्यातील रेडी येथील यशवंतगडावर होणार आहे. याप्रसंगी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि पोलीस अधीक्षक मोहन दहिकर उपस्थित राहणार‌ असल्याची माहिती नशाबंदी मंडळाचे राज्य संघटक व सचिव अमोल मडामे‌ यांनी दिली.

गोपुरी आश्रम येथे आयोजित पत्रकार परिषदेत मडामे बोलत होते. यावेळी कोकण विभागीय प्रमुख दिशा कळंबे, जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर आदी उपस्थित होते.

मडामे म्हणाले, ही मोहीम नशामुक्त भारत अभियानांतर्गत जिल्हा नशामुक्त भारत अभियान समिती, जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग सिंधुदुर्ग, जिल्हा पोलीस विभाग, दुर्गा मावळा प्रतिष्ठान आणि सिंधुदुर्ग नशाबंदी मंडळ (महाराष्ट्र राज्य, मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येत आहे. यानंतर राज्यातील प्रत्येक गड-किल्ल्यावर अशा उपक्रमांचा विस्तार करण्यात येणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा हा ऐतिहासिक वारसा असलेला प्रदेश असून, येथे असलेल्या गड-किल्ल्यांना शिवप्रेमी आणि पर्यटकांना नेहमीच आकर्षण असते. मात्र, काही ठिकाणी नशेच्या पदार्थांचा वापर आणि अस्वच्छतेची समस्या वाढत असल्याने या पार्श्वभूमीवर व्यसनमुक्त आणि स्वच्छ गडकिल्ले निर्माण करण्याच्या हेतूने ही मोहीम सुरू करण्यात येत आहे, असेही मडामे म्हणाले.

गेल्या पंधरा वर्षांपासून जिल्ह्यात नशाबंदी मंडळाच्या माध्यमातून अमली पदार्थविरोधी जनजागृती राबवली जात आहे. आता जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने या चळवळीला नवा वेग देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या शुभारंभ सोहळ्यासाठी शिवप्रेमी, युवक, महिला बचतगट आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नशाबंदी मंडळाचे सचिव अमोल मडामे यांनी केले.