
कणकवली : अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद ही महाराष्ट्रातील इतिहास विषयाच्या अभ्यासकांची अधिकृत संस्था असून यापूर्वी महाराष्ट्रात विविध ठिकाणी ३२ अधिवेशने झाली आहेत. यावर्षीचे ३३ वे राष्ट्रीय अधिवेशन कणकवली महाविद्यालयात १६ व १७ जानेवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आले आहे. तळकोकणातील हे पहिलेच राष्ट्रीय अधिवेशन असून त्यामध्ये अखिल भारतातातून जवळपास ३५० अभ्यासक तसेच प्रतिनिधी सहभागी होणार आहेत, अशी माहिती अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेच्या अध्यक्षा डॉ. अरुणा मोरे यांनी दिली.
कणकवली महाविद्यालयाच्या एच.पी. सी.एल. सभागृहात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. मोरे बोलत होत्या. यावेळी अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे सचिव प्राचार्य डॉ. सोपानराव जावळे, कार्यकारी मंडळ सदस्य डॉ. नारायण गवळी, डॉ. शोभा वाईकर, शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीचे सचिव विजयकुमार वळंजू, प्राचार्य युवराज महालिंगे, इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. सोमनाथ कदम, प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर व, अंतर्गत गुणवत्ता व हमी कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. शामराव डिसले, सामाजिक विज्ञान मंडळाचे सहसचिव प्रा. डॉ. बी. एल. राठोड, प्रा. अमरेश सातोसे, कॉलेजचे कार्यालयीन अधीक्षक संजय ठाकूर आदी उपस्थित होते.
डॉ. मोरे म्हणाल्या, राज्याच्या विविध भागातून तसेच परदेशातून म्हणजे दुबई येथूनही प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनातून इतिहासाच्या नवसंशोधकांना व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. शिवाय प्राचीन वारसा असलेल्या वास्तू, कातळशिल्पे यांचेही जतन यानिमित्ताने होणार आहे. हे अधिवेशन आयोजित करण्यास सहकार्य केल्याबद्दल डॉ. मोरे यांनी कणकवली शिक्षण मंडळाला धन्यवाद दिले.
डॉ.सोपानराव जावळे म्हणाले, या राष्ट्रीय अधिवेशनात प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक अशा तीन सत्रात शोधनिबंध सादर केले जातील. इतिहास परिषदेच्या वतीने देण्यात येणार्या पुरस्कारांचे वितरणही मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात येईल. ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, प्रसिद्ध अभ्यासक डॉ. अशोक राणा, यवतमाळ आणि इतिहास संशोधक डॉ. जी.डी. खानदेशे आदी मान्यवरांना प्रसिद्ध इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याचे डॉ.जावळे यांनी सांगितले.
विजयकुमार वळंजू म्हणाले, सिंधुदुर्गातील निसर्गरम्य पर्यटनस्थळे, इथला ऐतिहासिक वारसा याचे सर्वांनाच आर्कषण आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने विचारवंत, साहित्यिक व कलावंताच्या या भूमीत आंतरविद्याशाखीय अभ्यासकांना भौगोलिक, अध्यात्मिक, ऐतिहासिक पर्यटन व संशोधनाची नवी पर्वणी मिळणार आहे. त्याचा लाभ इतिहासप्रेमींनी घ्यावा. तसेच जिल्ह्याची महती सर्वदूर पोहचवावी.
प्राचार्य युवराज महालिंगे म्हणाले, शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ.राजश्री साळुंखे, सचिव विजयकुमार वळंजू व इतर पदाधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास परिषदेचे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी आम्ही पूर्वतयारी करीत आहोत. आमच्या महाविद्यालयातील सामाजिक विज्ञान मंडळ आणि अंतर्गत गुणवत्ता व हमी कक्षाच्या संयुक्त विद्यमाने हे अधिवेशन घेत आहोत. या अधिवेशनामुळे जिल्ह्याच्या इतिहासावरही प्रकाशझोत टाकला जाणार आहे.
प्रा. सोमनाथ कदम म्हणाले, अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या एकूण १४ समित्या कार्यरत केल्या आहेत. या परिषदेत सहभागी होऊ इच्छिणार्यांनी आपले शोध निबंध ३० नोव्हेंबरपर्यंत पाठवायचे आहेत असे आवाहन प्रा.सोमनाथ कदम यांनी केले.
इतिहास अभ्यासकांना पर्वणी !
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथे शिवरायांनी स्वतः उभारलेला सिंधुदुर्ग किल्ला हा मराठा आरमाराचा मानबिंदू आहे. सिंधुदुर्गला प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक काळात वैभवशाली इतिहास असून अलीकडेच जागतिक युनेस्कोने जाहीर केलेल्या जागतिक वारसा संरक्षण स्थळ यादीत सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग या दोन किल्ल्यांचा समावेश झाला आहे. त्याबाबतची माहिती देणारे सत्रही असणार आहे. त्यामुळे या अधिवेशनाच्या निमित्ताने इतिहास अभ्यासकांना पर्वणीच असणार आहे. शिवाय शस्त्र, कातळ शिल्प, किल्ले यांचे प्रदर्शनही या निमित्ताने भरवले जाणार असल्याचे डॉ. कदम यांनी सांगितले.










