राजू कोरगावकर यांचे उपोषण स्थगित

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: September 26, 2025 12:31 PM
views 471  views

कणकवली : कलमठ बाजारपेठ येथील शाळेच्या परिसरात एका संकुलात एका व्यक्तीने बिअर बार व परमिट सुरू करण्यासाठी संबंधित विभागाकडे अर्ज केला आहे. शाळेच्या परिसरात बिअर बार व परमिट रुम सुरू करण्यास परवानगी देऊ नये या मागणीसाठी राजू कोरगावकर हे कलमठ ग्रामपंचायत कार्यालयासमोर  उपोषणाला बसले होते. दरम्यान, संदीप मेस्त्री यांनी उपोषणकर्ते कोरगावकर यांची भेट घेत याप्रश्नी चर्चा केली. चर्चेअंती दारुचे दुकान सुरू न होण्याकरिता योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर कोरगावकर यांनी उपोषण सोडले. 

कलमठ बाजारपेठ येथील शाळेच्या परिसरातील एका संकुलात एका गाळ्यामध्ये एका बिअर बार व परमिट रुम सुरू करण्याबाबत संबंधित विभागाकडे अर्ज केला आहे. कलमठमध्ये दारू विक्रीचे दुकान सुरू करण्यास ग्रामस्थांचा विरोध आहे. कलमठ-बाजारपेठ येथे शाळा असून या परिसरात विद्यार्थ्यांचा वावर असतो. या परिसरात दारू विक्रीचे दुकान सुरू झाल्यास लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या परिसरात पुरातन विठ्ठल -रुखुमाई देवस्थान आहे. विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी दररोज भाविक येत असतात. या परिसरात दारु विक्रीचे सुरू झाल्यास सामाजिक वातावरण बिघडू शकतो. धार्मिक स्थळाच्या अगदी जवळ दारू विक्रीचे दुकान सुरू झाल्यास धार्मिक भावना दुखावण्याची शक्यता आहे. तसेच बाजारपेठ परिसरात पिंपळपारवर शिवतेजा मित्रमंडळाचे विविध कार्यक्रम दरवर्षी होतात. 

दारू विक्रीचे दुकान सुरू झाल्यास मद्यपींचा त्रास कार्यक्रमांसाठी येणाºया नागरिकांना होऊ शकतो. कलमठ बाजारपेठ परिसरातील लोक सुसंस्कृत असून दारू विक्रीचे दुकान सुरू झाल्यास बाजारपेठेतील सामाजिक वातावरण बिघडू शकते, असे कोरगावकर यांचे म्हणणे असून याचा गांभीर्याने विचार करून  बिअर बार व परमिट रुम परवानगी देण्याचा त्यांचा अर्ज संबंधित विभागाने फेटाळावा, अशी मागणी राजू कोरगावकर यांनी केली. 

संदीप मेस्त्री यांनी दिलेल्या आश्वासनानंतर श्री. कोरगावकर यांनी उपोषण सोडले. यावेळी उपसरपंच दिनेश गोठणकर, माजी उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुडतरकर, ग्रा. पं. सदस्य पप्पू यादव, अनुप वारंग, नितीन पवार, श्रेयश चिंदरकर, सुप्रिया मेस्त्री, नजराणा शेख, हेलन कांबळे, आबा कोरगावकर, परेश कांबळी, स्वरुप कोरगावकर आदी उपस्थित होते.