
कणकवली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या सर्वांची अस्मिता असून त्यांच्यामुळेच महिलांना सन्मानाचे जीवन मिळाले आहे. महिला शिक्षित आणि प्रशिक्षित झाल्या, तरच धम्म चळवळ आणि समाज परिवर्तनाचे कार्य गतीने करू शकतील. बाबासाहेबांनी दिलेला धम्म आणि त्यांनी निर्माण केलेली धम्म चळवळ समजून घेणे ही आमची सर्वांची जबाबदारी आहे. धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात दिलेले योगदान महत्वाचे आहे, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन, नुकतेच दी बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या महिला जिल्हा शाखेतर्फे कणकवली येथील जिल्हा भवन येथे जिल्हास्तरीय महिला कार्यकर्ता प्रशिक्षण आणि चिंतन शिबीर झाले. या मेळाव्याचे अध्यक्षस्थान महिला जिल्हाध्यक्षा सुषमा हरकूळकर यांनी भूषविले.
पदाधिकाऱ्यांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या विषयावर जिल्हा सरचिटणीस संजय पेंडुरकर म्हणाले, सर्वच क्षेत्रांत महिला आघाडीवर आहेत. त्यांनी धम्म चळवळीतही मागे राहता कामा नये. संस्थेच्या संघटक ममता जाधव (मुख्याध्यापिका), रजनी कासार्डेकर यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. हा सत्कार संस्थेच्या उपाध्यक्षा स्नेहा पेंडुरकर यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाला जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांमधून महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रास्ताविक जिल्हा पर्यटन प्रचार उपाध्यक्षा संचिता जाधव यांनी केले. सूत्रसंचालन जिल्हा महिला सरचिटणीस अपूर्वा पवार यांनी केले. ममता जाधव यांनी आभार मानले.










