
कणकवली : गोपुरी आश्रमाच्या वतीने नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आयोजित जागर स्त्री शक्तीचा उत्सव विचारांचा या कार्यक्रमात दुर्गेच्या प्रतीकात्मक रुपातल्या नवशक्तींच्या आराधनेने राजमाता जिजाऊंच्या विचारांची माळ गुंफण्यात आली. या कार्यक्रमात जिजाऊंच्या विचारांचा जागर आणि जिजाऊंच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या जिजाऊंच्या लेकींचा सन्मान करण्यात आला.
या माळेमध्ये जिजाऊंच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या दोन आदिशक्तींचा माई मेस्त्री आणि गोपुरी आश्रमाच्या संचालिका अर्पिता मुंबरकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. ज्यामध्ये कलमठ (ता.कणकवली) येथील बचत गटातील महिलांना एकत्रित करून संघटित शक्तीच्या बळावर सामाजिक एकतेचा वारसा पुढे नेण्याचेकार्य करणाऱ्या तन्वीर शिरगावकर तसेच नांदगाव (ता. कणकवली) येथील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपले नेतृत्व सिद्ध करत समाजामध्ये विकासात्मक व सकारात्मक बदलाची निर्मिती करणाऱ्या अफ्रोजा नावळेकर यांना सन्मानित करून हा नवरात्र उत्सव नव्या रूपात साजरा करण्याचा पायंडा गोपुरी आश्रमाने समाजामध्ये घालून दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक सापळे, प्रास्ताविक माहानंद चव्हाण, आभार सचिव विनायक मेस्त्री यांनी मानले.










