ज्येष्ठ दशावतारी कलावंत राजू हरयाण यांचे निधन

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: June 30, 2025 12:39 PM
views 2011  views

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील ज्येष्ठ दशावतारी कलावंत व दशावतार कलेतील कॉमेडीचा बादशहा म्हणून ओळख असलेले व करूळ मधलीवाडी येथील रहिवासी राजेंद्र सदाशिव हरयाण उर्फ राजू हरयाण (वय ५८) यांचे रविवारी दुपारच्या सुमारास निधन झाले. दशावतारी नाटक करून घरी आल्यानंतर ते झोपी गेले होते. या दरम्यानच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे जागीच निधन झाले. त्यांच्या पाश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व भाऊ असा परिवार आहे.

दशावतारी कलेमध्ये राजू हरयाण हे नाव एका मोठ्या अदाबीने घेतले जात असे. दशावतारी कलेत त्यांनी आपला एक वेगळा ठसा उमटवला होता.  दशावतारा मधील कॉमेडी सह अन्य भूमिका देखील ते उत्कृष्टपणे पार पाडत असत. सध्या ते कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरुर या दशावतार कंपनीमध्ये होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक मोठ्या दिग्गज दशावतारी कलावंतांसोबत त्यांचे नाव घेतले जात असे. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्यावर आज सोमवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.