कणकवलीत शिवसेनेचे १२ जूनपासून गाव चलो अभियान

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: June 09, 2025 16:58 PM
views 187  views

कणकवली : शिवसेना पक्षातर्फे कणकवली तालुक्यात १२ ते  २१ जून या कालावधीत गाव चलो अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या नियोजनाबाबत  पदाधिकारी व शिवसैनिकांची बैठक येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात झाली. यात गाव चलो अभियानाची रुपरेषा ठरविण्यात आली. 

बैठकीत कणकवली विधानसभा अध्यक्ष संदेश सावंत-पटेल यांनी मार्गदर्शन केले. गुरुवार १२ जूनला सायंकाळी ६ वा. जानवली जिल्हा परिषद मतदारसंघ, शुक्रवार १३ रोजी सायंकाळी ६ वा. हरकुळ जिल्हा परिषद मतदारसंघ,  शनिवार १४ रोजी सायंकाळी ६ वा. नाटळ जिल्हा परिषद मतदारसंघ, गुरुवार १९ रोजी सायंकाळी ६ वा. फोंडा जिल्हा परिषद मतदारसंघ, शुक्रवार २० रोजी सायंकाळी ६ वा. कलमठ जिल्हा परिषद मतदारसंघ, शनिवार २१ रोजी सायंकाळी ६ वा. कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघात गाव चलो अभियान राबविले जाणार आहे. 

प्रत्येक कार्यकर्त्याने तळागाळात जाऊन सर्व सामान्यांच्या अडचणी जाणून घ्यावात व पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न करावेत. तालुक्यातील सर्व बुथवर पक्षाची सभासद नोंदणी करायची असून पक्षप्रमुख एकनाथ  शिंदे यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाचा महत्त्वाचा घटक असून त्याचा योग्य तो मानसन्मान वरिष्ठ पदाधिकार्यांनी ठेवायचा आहे. ८० टक्के समाजकारण आणि २०टक्के राजकारण या बाळासाहेबांच्या ब्रीदवाक्याप्रमाणे सर्वांनी जनतेची कामे करायची आहेत. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्याने सर्वांनी तयारी करायची आहे. सर्व स्थानिक संस्था महायुतीच्या ताब्यात आल्या पाहिजेत. शिवसेनेची शाखा ही एका मंदिराप्रमाणे वाटली पाहिजे. तिथे गेल्यानंतर आपले काम होणारच याची खात्री पटली पाहिजे. तरच खर्या अर्थाने बाळासाहेबांच्या  विचारांचे पालन आपण करतो असे जनतेला वाटेल, असे मार्गदर्शन संदेश सावंत पटेल यांनी केले. बैठकीला महिंद्र सावंत, शेखर राणे, बाळू पारकर, दामू सावंत, हरेश पाटील, सरिता राऊत, प्रिया टेंबकर, मधुकर सावंत यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.