पुलांची कामे अर्धवट ठेवणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करा

सेनेच्या शिष्टमंडळाची मागणी
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: June 06, 2025 19:46 PM
views 205  views

कणकवली : सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी यांच्यासमवेत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाची कणकवली विश्रामगृह  येथे  बैठक झाली.यावेळी शिवसेना शिष्टमंडळाने सिंधुदुर्ग जिल्हातील सार्वजनिक  बांधकाम विभागाशी निगडीत रस्ते आणि ठेकेदाराने अर्धवट ठेवलेल्या पुलांमुळे बंद झालेल्या वाहतुकीचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली. यामध्ये प्रामुख्याने आचरा राज्य मार्गावरील पूल, माणगांव शिवापूर मार्गावरील दुकानवाड पूल आणि  दहिबाव नारिंग्रे मार्गावरील पूल  या  पुलांची  कामे ठेकेदाराने अर्धवट ठेवली असून नदी प्रवाहित झाल्याने  हे मार्ग वाहतुकीस बंद झाले आहेत.याचा नाहक त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे. त्यामुळे पुलाच्या बांधकामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदार आणि कामावर देखरेख ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी आणि वरील मार्ग सुरु करण्याच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी  माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी केली त्यावर  मिलिंद कुलकर्णी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मागण्या पूर्ण करण्याची ग्वाही दिली.यावेळी कणकवली कार्यकारी अभियंता विणा पुजारी, शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, संतोष सावंत उपस्थित होते. 

आचरा राज्यमार्गावरील वरवडे येथील पुलाचे काम पावसाळ्या आधी पूर्ण करणे गरजेचे होते.पुलाचे काम करताना नदीत माती दगड गोट्याचा  भराव टाकून पर्यायी मार्ग करण्यात आला होता तो भराव नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याने हा राज्यमार्ग आता पूर्णता बंद करण्यात आला आहे.तसेच वरवडे येथील पुलासाठी केले जाणारे कॉंक्रीट देखील दुय्यम दर्जाचे हाताने बनवून वापरले जात आहे. त्या पुलासाठी आर.एम. सी. प्लांट मध्ये मिश्रित  कॉंक्रीट वापरण्यात यावे तरच पुलाचा दर्जा टिकेल. दहिबाव नारिंग्रे मार्गावरील पूलाच्या बाबतीतही ठेकेदाराने अशीच दिरंगाई केल्याने अपूर्ण पुलामुळे हा रस्ता देखील बंद झाला आहे.माणगांव शिवापूर मार्गावरील दुकानवाड पूल देखील ठेकेदाराने अपूर्ण ठेवले असून तेथील जुन्या कॉजवेवरून सध्या वाहतूक सुरू आहे.मात्र  नदीच्या पाण्याची पातळी वाढली की हा कॉजवे  पाण्याखाली जातो त्यामुळे वारंवार अनेक गावांचा संपर्क तुटत आहे. त्याचबरोबर कॉजवे जीर्ण झाला असून केव्हाही तो वाहून जाण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे नवीन पुलांची कामे पावसाळ्या आधी पूर्ण करणे गरजेचे होते मात्र ठेकेदाराने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ती तत्परता दाखवली नाही. त्यामुळे अशा ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी शिवसेना शिष्टमंडळाने केली. 

निवडणूकीच्या वेळी काही गावांमधील रस्ते लोकसहभागातून करण्यात आले असून आता पुन्हा ते रस्ते जिल्हा नियोजन अथवा इतर निधीतून मंजूरीसाठी देण्यात आले आहेत.हे  रस्ते पूर्ण दाखवून त्याची बिले काढली जाणार आहेत.मात्र पूर्ण झालेल्या रस्त्यांवर शासनाचा निधी खर्च होता नये याची दक्षता घ्यावी असे आदेश जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोन्ही कार्यालयांना द्यावेत.आचरा बायपाससाठी पोस्टाच्या जमिनीचा अडथळा दूर होत नसेल तर दुसऱ्या पर्यायी मार्गाची निवड करून  लवकरात लवकर आचरा बायपास पूर्ण करावा अशी सूचना शिवसेना नेत्यांनी केली.

हळवल उड्डाणपुलाच्या जोड रस्त्यासाठी लागणाऱ्या जमिनीच्या संपादनासाठीचा निधी मंजूर आहे परंतु जमिनीचे संपादन करण्यात आले नाही.हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा. तसेच रस्त्यांची कामे दर्जेदार करून घ्यावीत.  कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या काळात १५ कोटींचे जॉब काढण्यात आले होते.ठेकेदारांनी ती कामे पूर्ण देखील केली मात्र त्याची बिले अद्याप देण्यात आलेली नाहीत ती बिले संबंधित ठेकेदारांना लवकरात लवकर मिळावीत अशा मागण्या  माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी सा. बां. चे अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी यांच्याकडे केल्या आहेत त्यावर  मिलिंद कुलकर्णी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या मागण्या पूर्ण करण्याची ग्वाही दिली आहे.