
कणकवली : कणकवली शहरातील बिजलीनगर व कनकनगर येथील केटी बंधाऱ्याला लोखंडी प्लेट टाकून पाणी अडवा, अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी लघु पाटबंधारे विभागाच्या श्रीम. शिंदे यांच्याकडे केली आहे. नदीपात्रातील वाहून जाणारे पाणी प्लेट टाकून अडवल्यावर याचा फायदा कणकवली शहरातील नागरिकांना होणार असल्याचे श्री. नाईक यांनी म्हटले आहे.
कनकनगर व मराठा मंडळजवळील केटी बंधाऱ्याला प्लेट टाकून पाणी अडवल्यास त्याचा फायदा हा कणकवली शहरातील जलस्रोतांना होतो. यावर्षी डिसेंबर महिना आला तरी अद्यापही प्लेट लावल्या नसल्याने हे पाणी वाहून जात आहे. यामुळे शहरातील जलस्रोतांची पाण्याची पातळी खालावत चालली आहे. भविष्यात शहरातील नागरिकांना पाण्याची टंचाई भासू नसे यादृष्टीने आताच या दोन्ही बंधाऱ्यांना लोखंडी प्लेट टाकून पाणी अडवा. येत्या ८ दिवसात पाणी न अडवल्यास पाटबंधारे कार्यालयावर धडक देण्याचा इशाराही नाईक यांनी दिला आहे.










