
कुडाळ | प्रसाद पाताडे : शेती व्यवसायात काळाच्या ओघात मोठा बदल होत आहे. आता शेतकरी बांधव पारंपारिक पिकांच्या शेती ऐवजी हंगामी अन नगदी तसेच फळबाग पिकांच्या शेतीकडे वळले आहेत. कुडाळ तालुक्यातील एका युवा शेतकऱ्यांने पारंपारिक पिकांसोबतच कलिंगड या हंगामी पिकाच्या शेतीतून चांगले विक्रमी उत्पादन मिळवून दाखवले आहे. विशेष म्हणजे या तरुणाने सेंद्रिय पद्धतीने कलिंगड उत्पादित केले आहे.
यामुळे हा सेंद्रिय शेतीचा प्रयोग दशक्रोशीत चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. कुडाळ तालुक्यातील बिबवणे येथील पप्पू वेंगुर्लेकर या युवा शेतकऱ्याने आपल्या पाच एकर शेत जमिनीत गेली आठ वर्ष कलिंगड लागवड करत सेंद्रिय पद्धतीने यातून ऑक्टोबर ते मे या आठ महिन्याच्या कालावधीत तीन लाखा पेक्षा उत्पन्न घेत आहे.
सुरुवातीला दोन वर्ष नोकरीचा शोध करत असताना ठिबक सिंचनाची माहिती त्यांना प्राप्त झाली आणि मग नोकरी एवजी त्यांनी आधुनिक शेती व्यवसायात आपलं नशीब आजमावयाला सुरुवात केली. त्यांचा हा निर्णय मात्र त्यांच्यासाठी आता फायदेशीर ठरला आहे. पप्पू वेंगुर्लेकर यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी आपल्या ५ एकर शेत जमिनीत तीन टप्प्यात "ऑगस्टा" या जातीच्या कलिंगडची लागवड केली. तीन टप्प्यात त्याची लागवड केली असून पहिल्या टप्प्यात 15 टन उत्पादन मिळाल असून आणखी दोनदा त्यांना यातून उत्पादन मिळणार आहे.
विशेष म्हणजे कलिंगड चे पीक सेंद्रिय पद्धतीने त्यांनी उत्पादित केले असून शेणखत, वर्मी कंपोस्ट दही यांसारख्या सेंद्रिय खतांचा वापर त्यांनी केला आहे. यामुळे सेंद्रिय शेती करूनही दर्जेदार उत्पादन मिळवले जाऊ शकते हेच पप्पू वेंगुर्लेकर यांनी दाखवून दिले आहे. कलिंगड सोबतच इतरही भाजीपाला वर्गीय पिकांची शेती सुरू केली आहे.
पाले भाज्या फळ भाज्या यांसारख्या पिकांची ते शेती करत असून उत्पादित होणारा शेतमाल स्वतःच स्टॉल लावून विक्री करत आहे. यामुळे दिवसाकाठी दोन हजारापर्यंतची कमाई त्यांना होत आहे. पप्पू यांचे मुंबई गोवा महामार्गलगत बिबवणे येथे घर असल्याने रस्त्याच्या कडेला स्टॉल उभारून तिथेच कलिंगड आणि भाजी विक्री सुरू केली आहे.
त्याने उत्पादित केलेले भाजीपाला आणि कलिंगड पीक सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेले असल्याने या शेतमालाला मोठी मागणी असून दिवसाकाठी दोन हजाराची कमाई होत असल्याने आर्थिक चणचण दूर झाल्याचे पप्पू सांगतो. निश्चितच पप्पू यांचा हा प्रयोग इतरांसाठी मार्गदर्शक राहणार असून सेंद्रिय शेती देखील फायदेशीर ठरू शकते हे पप्पू वेंगुर्लेकर यांनी दाखवून दिले आहे.