
सावंतवाडी : युवा उद्योजक तथा भाजपचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या संकल्पातून उभारण्यात आलेल्या चराठे तिलारी कॉलनी येथील श्री स्वामी समर्थ मंदीराचा कलशारोहण सोहळा मंगळवारी भक्तिमय वातावरणात स्वामीभक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला. रात्री उशिरापर्यंत राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आणि स्वामीभक्तांनी उपस्थिती दर्शवित श्री स्वामी समर्थांचे मनोभावे दर्शन घेतले.
विशाल परब आणि त्यांच्या पत्नी वेदिका परब यांनी कलशाचे विधिवत पूजन केले. स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक तसेच विधिवत पूजाअर्चा त्यांच्या हस्ते पार पडली.या कार्यक्रमाला सकाळपासूनच भक्तगणांनी उपस्थिती दर्शविली होती. रात्री उशिरा सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख-इंदुरीकर यांचे हरिकीर्तन पार पडले. या कीर्तनालाही मोठ्या प्रमाणात जनसागर लोटला होता. चराठे येथील निवासस्थानी श्री स्वामी समर्थ महाराजांचे मंदीर उभारले आहे. या मंदिरामध्ये स्वामींची तेजस्वी अशा मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे.