
कणकवली : कलमठ ही कणकवली तालुक्यातील महत्त्वाची ग्रामपंचायत मानली जाते. या ग्रामपंचायतीची सदस्य संख्या ही 17 असून 15 वाड्यांपेक्षा जास्त वाड्या या गावात आहेत. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष पुरस्कृत श्री देव काशीकलेश्वर विकास पॅनल निवडणूक लढवत आहे. या पॅनलच्या उमेदवारांनी कलमठ बाजारपेठ येथून प्रचाराला सुरुवात केली.
कलमठ ग्रामपंचायतच्या निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. श्री काशीकलेश्वर विकास पॅनलच्या उमेदवारांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन गाठीभेटी घेतल्या व त्यांचे आशीर्वाद देखील घेतले. यावेळी कलमठ ग्रामपंचायत च्या माध्यमातून रस्ते, लाईट ,पाणी हे आपण सर्व ग्रामस्थांपर्यंत पोहोचवले आहे. अजूनही विकास कामे ग्रामस्थांपर्यंत आपण पोहोचवणार आहोत तसेच शासकीय योजना ज्या कृषी तसेच उद्योग व्यवसायाच्या असतील त्या सर्व लोकांपर्यंत पोहोचवणे हा उद्देश असल्याचे सरपंच पदाचे उमेदवार रामदास विखाळे यांनी सांगितले.
यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत श्री देव काशी कलेश्वर विकास पॅनलचे प्रभाग पाचचे उमेदवार वैदही हजारे, अनुप वारंग, सचिन खोचरे, यांच्यासह बाळू मेस्त्री, किरण हुन्नरे, संदीप कांबळे, सचिन पेडणेकर, प्रशांत वनस्कर सिकंदर मेस्त्री, इम्तियाज फकीर ,प्रसाद मटकर, व अन्य कार्यकर्ते देखील उपस्थित होते.