कै. वसंतराव गोविंदशेठ केसरकर स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार सुरेश ठाकूर यांना प्रदान

Edited by: विनायक गावस
Published on: September 15, 2023 11:43 AM
views 97  views

सावंतवाडी : "मला शैक्षणिक क्षेत्रात ४० वर्षे सेवा करीत असताना अनेक मानाचे पुरस्कार लाभले. सेवानिवृत्तीनंतर गेली दहा वर्षे कथामाला आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे मालवण तालुकाध्यक्ष म्हणून कार्य करीत असतानाही दिग्गज मान्यवरांकडून गौरव झाला. पण आज 'छात्र प्रबोधन मंडळ' सावंतवाडी ह्या संस्थेचा कै. वसंतराव गोविंदशेठ केसरकर स्मृती पुरस्कार छात्र प्रबोधन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी माझ्या घरी आचरेत येऊन मला प्रदान केला. त्याचे मोल मला शब्दात व्यक्त करता येणार नाही," असे उद्गार सुरेश शामराव ठाकूर उर्फ ठाकूर गुरुजी यांनी कै. वसंतराव गोविंदशेठ केसरकर स्मृती पुरस्कार स्वीकारताना काढले. यावेळी भरत गावडे (सदस्य महाराष्ट्र राज्य नवीन शैक्षणिक धोरण सुकाणू समिती), विकास गोवेकर, अरविंद सरनोबत, लक्ष्मणराव राणे (माजी सैनिक) आदी छात्र प्रबोधन मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

           

या छात्र प्रबोधन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ठाकूर गुरुजींच्या आचरे येथील "श्यामसुंदर" ह्या निवासस्थानी त्यांचा सत्कार केला. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख रुपये पाच हजार .असे सत्काराचे स्वरूप होते. पुरस्कार प्रसंगी  भरत गावडे म्हणाले,"आज सेवानिवृत्त झाल्यावरही शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यात सदैव झोकून काम करणाऱ्या ठाकूर गुरुजींना पुरस्कार प्रदान करीत असताना आम्हा सर्व छात्र प्रबोधन मंडळाच्या कार्यकर्त्यांना अत्यानंद होत आहे".

         

विकास गोवेकर यांनी  पुरस्काराची पार्श्वभूमी विषद केली. जवळ जवळ गेली ४० वर्षे सुरेश ठाकूर यांचे कार्य आपण जवळून अनुभवले, असे ते म्हणाले.  आपल्या सत्काराला उत्तर देताना सुरेश ठाकूर म्हणाले, "सदरचा पुरस्कार माझा उत्साह वाढविणारा आहे. यातील पाच हजार रकमेत माझे एक हजार एकशे अकरा रुपये घालून हा निधी मी साने गुरुजी कथामाला मालवणच्या कथाकथन शिबिरासाठी खर्च करणार आहे.

         

यावेळी छात्र प्रबोधन मंडळ सावंतवाडीच्या वतीने अरविंद सरनोबत यांनी सर्वांचे आभार मानले. तर ठाकूर कुटुंबियांच्या वतीने समीर ठाकूर यांनी छात्र प्रबोधन मंडळाचे आभार मानले. या घरगुती सत्कार सोहळ्यास वीणा ठाकूर, सतीश ठाकूर, छाया ठाकूर, साक्षी ठाकूर, रुची ठाकूर, सीमा यशवंत ठाकूर आदी ठाकूर कुटुंबीय उपस्थित होते.