
सावंतवाडी : मडूरा - सातोसे मार्गे सातार्डा - किनळे हा रस्ता जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येत असून सातार्डा घोगळवाडी ते सातोसे रेखवाडी हा रस्त्याचा भाग उत्तम स्टील कंपनीच्या परिसरातून जातो. याच रस्त्यावरून शासकीय एसटी व कदंबा बस फेऱ्या सुरू असून दरवर्षी गणेशोत्सवाच्या कालावधीत गणेश मूर्तींची ने-आण याच मार्गांवरून केली जाते. हा रस्ता खड्डेमय असून त्यात पावसाचे पाणी साचल्याने गणेशमूर्तींची वाहतूक करणे खूपच धोकादायक ठरते. याकडे शासन, प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याने येथील ग्रामस्थ पुढाकार घेऊन दरवर्षी आर्थिक पदरमोड करून रस्त्याची डागडूजी करतात. जुन्या मार्गाची खड्डे पडून पुरती चाळण झाली आहे. डांबरीकरण उखडून गेल्याने हा मार्ग मातीचाच झाला आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने या मार्गावरून वाहने हाकणे जिकरीचे झाले आहे. त्यामुळे कदंबा प्रशासनाने गाडी बंद करण्याचा इशारा दिला आहे. कदंबा गाडीतून दररोज मडूरा दशक्रोशीतून शेकडो युवक - युवती गोव्यात नोकरीसाठी प्रवास करतात. कदंबा गाडी बंद झाल्यास नोकरीवर गदा येणार आहे. त्यामुळे दशक्रोशीतील स्थानिक व सामाजिक कार्यकर्ते यांनी श्रमदानातून रस्ता डागडूजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रविवारी शेकडो जणांनी श्रमदान करून रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत केला. या रस्त्यावर निधी खर्च करून रस्ता पूर्ववत करून प्रशासन, शासनाने संवेदनाशिलता दाखवावी अशी मागणी दशक्रोशीतून होत आहे.